पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



७०

 दुसरा अतिवृष्टीचा प्रदेश गंगेच्या मुखापासून सुरू होऊन पुढे ब्रह्मपुत्र नदाचे प्रदेशांतून उत्तरेकडे आसामचे पश्चिम प्रांतांतून हिमालयपर्वतापर्यंत जाऊन नंतर तसाच त्याचे पायथ्याने बहुतेक काश्मीरपर्यंत पोहोचतो. इकडे अतिवृष्टि होण्याचे कारण पावसाचा प्रवाह जो बंगालचे उपसागरांतून उत्तरेकडे सरतो, त्यास ब्रह्मदेश व आसाम एथील उच्च प्रदेश आड येऊन त्याचा प्रवाह उत्तरेकडे वळून बंगाल प्रांतावर येऊन पुढे हिमालयाचा अडथळा आल्यामुळे भागीरथीच्या सखल मैदानांतून थेट पेशावरपर्यंत पाऊस पडत *जातो; व हिमालय पर्वताच्या अडथळ्यामुळे हवेतील बहुतेक वाफ पर्जन्यरूपाने खाली येते, म्हणून एथे अतिवृष्टि होते.

 अनावृष्टीचा प्रदेश:--हा बहुतेक कच्छ प्रांत, सिंध प्रांत, राजपुतान्याचा पश्चिम भाग, व नैर्ऋत्येकडचा पंजाब हा होय. ह्या भागाचे एके बाजूस मात्र थोडासा समुद्र आहे. परंतु तोही एका फांट्याचे शेवट आहे. बाकीचा भाग बलुचिस्तान, अफगाणिस्तान वगैरे प्रांतांच्या जमिनीने वेष्टित असल्यामुळे पावसास अवश्य लागणारी पाण्याची वाफ एथपर्यंत येऊन पोहोचण्यास पुरत नाहीं.

-----

 * ह्याचप्रमाणे स्थिति आसाम व ब्रह्मदेश यांचे दरम्यान क्याशिया म्हणून ४००० । ५००० फूट उंचीचे डोंगर आहेत तेथे होते. त्यांमध्ये चिरपुंजी म्हणून एक ठिकाण आहे, तेथे तर पावसाचे वर्षाचे मान कधीं कधीं ६०० इंचांपेक्षा जास्त असते. इतका पाऊस पृथ्वीवर दुसरे कोठेही पडत असलेला आढळत नाहीं. इ० स०१८६९ साली तर तेथे ८०५ इंच पाऊस पडला असे म्हणतात!