पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६९

की, मुंबई बंदरांत दर वर्षाचे पावसाचे मान ८९ इंच आहे. रत्नागिरीस ९७ इंच, आणखी दक्षिणेस वेंगुर्लास १०५ इंच, कारवारास ११९ इंच, मंगलुरास १३० इंच, काननुरास १३२ इंच. परंतु, ह्या ठिकाणांपासून खाली जाऊ लागलें म्हणजे पर्वत थोडथोडे आंत जाऊ लागतात, आणि किनाऱ्यावर पाऊस कमी कमी पडू लागतो. कालिकत ह्या ठिकाणी पावसाचे वर्षाचे मान ११२ इंच आहे; त्याचे खालीं कांची एथे १०७ इंच आहे. पुढे समुद्र ओलांडून सिंहलद्वीपांत गेले असतां, पश्चिम किनाऱ्यावर कोलंबो एथे पावसाचे मान ७८ इंच म्हणजे मुंबई इतकेंच सरासरी आहे. पुनः मुंबई सोडून उत्तरेकडे जाऊ लागले, तर सुरतेस ४० इंच, भडोचास ४२, आणि ढिसा एथे २४ इंच ह्याप्रमाणे कमी होत जाते. घाटमाथ्यावर तर पावसाची शिकस्तच होते. महाबळेश्वरास पावसाचे मान २०० पासून ३०० इंच आहे. अशा तऱ्हेने दक्षिणेस त्रिवेंद्रमपासून उत्तरेस दमण बंदरापर्यंत व समुद्रकिनाऱ्यापासून पूर्वेस घाटमाथ्यापर्यंत अतिवृष्टीचा एक प्रदेश होय. तेथे अतिवृष्टि होण्याचे कारण समुद्र लगत असून सह्याद्रि मध्ये आड आल्यामुळे पाऊस थोपून राहतो, व मागील वाफेचा प्रवाह एकसारखा सुरू असल्यामुळे कोंकणांत अतिवृष्टि होते. त्याचप्रमाणे, खालचे ढग घाटमाथ्यावर चढून जाण्यास चालक शक्ति म्हणजे उष्णता पाहिजे ती ढग आपल्यामधूनच खर्च करितात; म्हणजे त्यांच्यांतील उष्णता घाटमाथ्यावर गेल्यावर आपोआपच कमी होते, म्हणूनच तेथे पुष्कळ पाऊस पडतो.