पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११७

पडते. ह्या सर्वांचे सविस्तर वर्णन करू लागलो तर निराळा ग्रंथच होईल.

 मनुष्यांस व जनावरांस झाडांच्या सावलीपासून आश्रय मिळतो हाही एक झाडांपासून फायदा आहे. आगगाडी व इतर रस्ते यांवर उन्हाचा ताप निवारण होण्यास तेथे झाडे पाहिजेतच. तसेच, शेते वगैरे ठिकाणीही मनुष्यांस आश्रयास झाडे पाहिजेत.

 झाडांची समृद्धि जेथे पुष्कळ आहे, तेथे अनेक प्रकारचे धंदे चालू असतात, व नवे नवे उत्पन्न होत असतात. ह्या सर्वांचे वर्णन करावे तितकें थोडे आहे. आपल्या ह्या मुंबई इलाख्यांतील कारवार, बेळगांव, कुलाबा, ठाणे ह्या जिल्ह्यांकडे पहा ! एथे इमारती लाकडांच्या व्यापारावर हजारों मजूर आपलीं पोटें भरीत आहेत, व कित्येक व्यापारी सधन होऊन बसले आहेत. हिरडे जमविण्याच्या कामावर, जळाऊ लाकडे तोडण्याच्या व नेण्याच्या कामावर, गवत कापण्याच्या कामावर, हजारों मजूर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु तीच स्थिति सोलापूर, नगर, विजापूर ह्या जिल्ह्यांकडे पहा. इकडे जंगल म्हणण्यासारखे नसल्यामुळे वरील जिल्ह्यांमध्ये जे उपजीविकेचे साधन ते इकडे नाही. म्हणून झाडांची वृद्धि झाल्यापासून पुष्कळ लोकांस उपजीविकेचे नवीन साधन प्राप्त होणार आहे.

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf