पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



११६

आटून जातील. ह्याकरितां तळ्यांसभोंवतीं झाडे लाविली, तर त्यांपासून वाऱ्यास अडथळा होऊन बाष्पीभवन फार जलद होत नाहीं.

उद्योगधंद्यांची वाढ वगैरे.

 झाडांपासून व्यवहारामध्ये उपयोगी असे अनेक पदार्थ उत्पन्न होतात, हे सांगणे नको. इमारतींस, आगगाड्यांस, नौकांस व इतर अनेक तऱ्हेच्या वाहनांस, तसेच मेज, खुर्च्या वगैरे सामानांस जे इमारती लाकूड लागते ते सर्व झाडांपासून मिळते. अग्नीपासून व्यवहारामध्ये लहानमोठे किती फायदे आहेत, हे एथे निराळे सांगावयास पाहिजे असे नाहीं. अग्नि जर नसता, तर आमचा सर्व व्यवहार अगदी बंद पडला असता. तो अग्नि मिळण्यास सर्पण झाडांच्या लाकडांपासून प्राप्त होते. आगगाडी वगैरे वाफेचीं यंत्रे चालविण्यास अग्नि दगडी कोळशांपासून उत्पन्न करतात. परंतु, हा कोळसाही मूलतः झाडांपासूनच झालेला आहे. निरनिराळी तेले व चरब्या वगैरे बहुतेक ज्वालाग्राही पदार्थ प्रत्यक्ष अगर परंपरेने झाडांपासूनच उत्पन्न झालेले आहेत. धान्य, फळे, मुळे, गवत वगैरे सर्व खाद्य पदार्थ प्राण्यांस प्रत्यक्ष अगर परंपरेने झाडांपासूनच प्राप्त होतात. आपल्या बहुतेक औषधी झाडांपासूनच उत्पन्न होतात. झाडांची पानेही अनेक उपयोगांस येतात. हिरड्यांसारखी कित्येक झाडांची फळे कित्येक प्रकारच्या रंगांचे उपयोगी पडतात. बाभूळ, तरवड वगैरे झाडांच्या साली चांबडी रंगविण्यास उपयोगी पडतात. सारांश, झाडांची फुले, फळे, पाने, मुळे, लाकूड वगैरे हरएक उत्पन्न कांहींना कांहीतरी उपयोगी