पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०६

त्याचे खत लवकर होत नाहीं; म्हणून ते जाळून त्याची राख खतास घातली पाहिजे. परंतु लाकडापासून राख फारच थोडी उत्पन्न होते. मुख्य खत उत्पन्न होण्यास पानेच उपयोगाची आहेत, व तीही विपुल उत्पन्न होत असतात.

 दुसरा असा एक चमत्कार दृष्टीस पडतो की, ज्या दिवसांमध्ये आपणांस खताची जरूर असते त्याच सुमारास बहुतेक झाडाची पाने गळून पडतात. आमची खरिपाचीं व रबीचीं सर्व पिके माघ मासीं बहुतकरून खलास होतात. व पुढील सालचे बरसातीकरितां लोक पुनः चैत्रवैशाख मास जमिनी नांगरून खते घालून तयार करून ठेवितात. झाडांची पानेही माघफाल्गुनमासी गळून पडत असतात. चैत्र महिन्यांत नवीन पालवी फुटत असते. तथापि, कित्येक झाडांची पानें चैत्रांतसुद्धां गळून पडत असतात. जणू काय, खतास उपयोगी पडावे म्हणूनच हंगामशीर थोडा अगोदर झाडे आपली पाने टाकून देतात. झाडांची पाने वर्षातून जीं एक वेळां गळून पडतात ती खतास उपयोगी पडावे म्हणून पडतात, असा सृष्टिनियमच दिसतो.

 हीं जीं पाने आपणांस मिळतात ती आपणांस व्याजादाखल मिळत असतात. मुद्दल जी झाडे ती कायमच असतात. गवत व लहान लहान झाडें कुजूनसुद्धा चांगले खत उत्पन्न होते. परंतु त्यापेक्षाही मोठाल्या झाडांच्या पानांचे खत उत्तम असते. कारण, गवताच्या व लहान लहान झाडांच्या मुळ्या जमिनीच्या पृष्ठभागापासून फार खोल उतरत नाहींत; म्हणून त्यांच्या पोषणास