पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१०७

जी द्रव्ये लागतात, ती जमिनीमधून उत्तरोत्तर कमी कमी होत जातात. मग अर्थातच अशा जमिनीवर गवत व इतर लहान झाडे चांगलीं पोसत नाहींत व पोसली तरी त्यांमध्ये पोषक द्रव्ये फार कमी प्रमाणाने असतात. आतां, ही गोष्ट खरी कीं, गवत व इतर लहान झाडे कुजून जागच्या जागीच राहिली तर त्या जमिनीवर पुनः गवत व तशाच प्रकारची झाडे चांगली उगवण्यास व्यत्यय येणार नाही. मोठाल्या झाडांची गोष्ट अगदी भिन्न आहे. ह्या झाडांच्या मुळ्या जमिनीमध्ये पुष्कळच खोल जातात. व जमिनीमध्ये खोल जीं पोषक द्रव्ये असतात ती आपल्या मुळ्यांंच्या द्वारे वर आणितात. अशा प्रकारे जमिनीच्या पोटामधील पोषक द्रव्यें पृष्ठभागावर आणण्यास झाडांवांचून दुसरे साधन नाहीं. शेतामध्ये आपण आज हजारों वर्षे तीच तीच धान्ये पेरीत आलो आहों. त्या धान्याचा दाणा व वैरण हीं उत्पन्न होण्यास जी द्रव्यें अवश्य आहेत ती सर्व आपणांस जमिनींतून प्राप्त होतात. ही द्रव्यें हजारों वर्षे जर आपण जमिनींतून काढीत आलो आहों, तर ती उत्तरोत्तर नाहींतशी होत गेली पाहिजेत. ज्या मातींतील कस ( म्हणजे हीं पोषक द्रव्यें ) नाहींसा झाला आहे अशी माती दूर करून तिचे जागी नवी माती घालावयाची हा नांगरण्याचा मुख्य हेतु आहे. परंतु फार चांगल्या नांगरानेसुद्धा एक हातापेक्षा जास्त खोल माती खालींवर केली जात नाहीं. सारांश, पृष्ठभागापासून एक हातापर्यंतची खोल माती कांहीं वर्षांनीं तरी निस्सत्त्व झाली पाहिजे. म्हणून धान्य पेरून