पान:हिंन्दू सम्राट्.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् कृष्णदेवराय तुळुव.

(६९)

देखील ह्याच चढाईच्या धोरणाने दक्षिणेंत स्वान्या करून जागजागीं आपलीं लष्करी ठाणीं स्थापन केली आणि मदुरेला तर एक सुभेदारहि नेमून ठेवला !

 मुसलमानांच्या या स्वान्यांमध्ये हजारो निरपराध हिंदुप्रजेची कत्तल, देवळांची लुट आणि विध्वंस, हिंदु राजांना अटक व बाटवाबाटवी इत्यादि पूर्वी माहीत नसलेले अघोर प्रकार पाहून हिंदूंचीं मनें विषण्ण व संतप्त झालीं ! तेव्हा द्वारसमुद्र येथील वीरबल्लाळ आणि अनेगुंदी येथील हरिहर व बुक्क ह्यांच्यासारख्या वीरांनी एकत्र होऊन, इस्लामी सत्ता उत्तर भारताप्रमाणे कर्नाटकांत दृढ होण्यापूर्वी तिला वेळींच प्रतिकार करून हिंदु धर्मरक्षणासाठी एका प्रबळ हिंदु राज्याची स्थापना करण्याचा विचार केला. शृंगेरी येथील विद्यारण्य स्वामींनीहि त्यांना आशीर्वाद देऊन बरेंच साह्य केले. त्या सुमारास दैववशात् महंमद तुघलघाविरुद्ध जिकडे तिकडे सुरूबंडाळी झाली.

 ह्या अपेक्षित संधीचा फायदा घेऊन त्यांनी इ० स० १३३६ मध्ये एका सुरक्षित ठिकाणीं 'विजयनगर' शहराचा आणि तद्द्वारा पूर्वसंकल्पित अशा हिंदु साम्राज्याचा पाया घातला. ह्या साम्राज्यामध्ये चार राजवंशांनी मिळून सुमारे तीनशे वर्षे यावनी सत्तेचा लोंढा तुंगभद्रेच्या उत्तरेकडील काठावर थोपवून धरिला! ह्या सर्व सम्राटांमध्ये * कृष्णदेवराय तुळुव हा परम प्रतापी, वैभवशाली व कीर्तिमान् होऊन गेला. म्हणून त्याचें चरित्र आपणांस पहावयाचें आहे.


  • हरिहर, बुक्क, देवराय, कृष्णदेवराय आणि रामराजा हे विशेष

कर्तृत्ववान् होते; परन्तु लोकांच्या नजरेसमोर फक्त रामराजाचें नांव आणि तेंहि तालिकोटची लढाई हरलेला व युद्धांत मेलेला अभागी राजा म्हणून येत असतें !