पान:हिंन्दू सम्राट्.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धार्मिक आन्दोलन

(६५)

मोकळ्या मनाने सांगणारे साधुसंत ह्यांच्यामध्ये धार्मिक व साहित्यविषयक तीव्र झगडा होऊन त्यांत बहुजन समाजाच्या प्रतिनिधींनीं-साधुसंतांनी- जय मिळविला ! रामानुज, ज्ञानेश्वर, नामदेव, तुलसीदास, तुकाराम वगैरे सर्व मंडळी ह्या पंथापैकी होत. ह्यामध्ये ब्राह्मणापासून महारापर्यंत इतकेंच नव्हे तर कबीर व शेखमहंमद बाबा ह्यांसारखे कित्येक मुसलमानही होते. ह्याखेरीज दुसराही एक पंथ असें म्हणणारा होता की, 'मुसलमानी आक्रमण केवळ धार्मिक व साहित्यिक चळवळीने थांबणार नाही; त्यासाठी राजकीय स्वातंत्र्याच्या स्थापनेचा कांही तरी प्रयत्न करावा.' रामदास, गुरु गोविंद सिंह, मुक्तेश्वर वगैरे मंडळी या पंथांतील होत. त्यांचेविषयी पुढे विचार करावयाचा असल्यामुळे येथे अधिक लिहीत नाही. ह्या निरनिराळ्या पंथांतील लोकांची ईश्वरभक्ति व समाजहिताविषयी कळकळ सारखीच होती; तरी पण त्यांच्या ग्रंथांवरून त्यांच्या विचारसरणींतील भिन्नता आणि वैशिष्टय कळून येतें. असो.

 पंजाबांतील शीख व महाराष्ट्रांतील मराठे ह्यांनी ह्या आंदोलनानंतर मिळविलेली राजकीय यशस्विता बाजूस ठेवली, तरीदेखील केवळ धार्मिक व साहित्यिक दृघ्या आमच्या हिंदु संतकवींनी मुसलमान साधूवर आपल्या आर्य तत्वज्ञानाची आणि भावनांची चांगलीच छाप बसविली होती, असें दिसून येतें.

शेख महंमद अविंध | त्याचे हृदयीं गोविंद ।


 म्हणणारे शेख महंमदासारखे थोर मुसलमान महाराष्ट्रधर्मातील उदात्त व निर्मल भक्तिभावाने- पंढरपूरच्या सुखसोहळ्याने तल्लीन होऊन पांडुरंगाचे भक्त झाले व इतर हिंदु संतांबरोबर विठ्ठल नामाचा गजर करीत नाचले ! हिन्दूंच्या मूर्तिपूजेचें स्पष्टीकरण त्यांनी पुढीलप्रमाणे उत्कृष्ट प्रकारें केलें आहे —