पान:हिंन्दू सम्राट्.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६४)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

 कर्तृत्वाला फारसा वाव उरला नाही. त्यामुळे त्या वेळच्या दोनतीन शतकां- सम्बन्धीचा (राजकीय ) इतिहास म्हणजे देशांतील बहुजनसमाजाचा इतिहास नसून आक्रमण करूं पाहणाऱ्या विदेशी मुसलमान विजेत्यांचा इतिहास होय. आता एवढी गोष्ट सिद्ध आहे की, ज्या हिंदु जातीमध्ये चंद्रगुप्त, शंकराचार्य आणि शिवाजी ह्यांच्यासारखे अलौकिक पुरुष उत्पन्न होऊं शकतात, ती हिंदु जाति केव्हाही नष्ट होणे शक्य नाही. मात्र वर सांगितल्याप्रमाणे हिन्दु जातीची ती जीवनगंगा कोणत्या दिशेने दुथडी भरून चालली होती, ह्याविषयी इतिहासामध्ये मिळावी तेवढी माहिती मिळत नाही. त्यासाठी भारतीय भाषांमधील उच्च साहित्याकडेच आपणांस धाव घेतली पाहिजे.

 हिन्दु समाज हा स्वभावतः दैवी संपत्तीचा असल्यामुळे आमच्या राजकीय, सामाजिक किंवा साहित्यिक अशा सर्व हालचालींमध्ये धर्माची छाप विशेष दिसून येते. बौद्धधर्माबरोबर शंकराचार्यांनी केलेला शांतसंग्राम, आपण सातव्या प्रकरणांत मागे पाहिला आहेच. त्यानंतर सुमारें पांचशे वर्षांनंतर तितक्याच जोराचें पुनः एक धार्मिक आंदोलन सुरू झाले. त्या- मध्ये निरनिराळ्या विचारांच्या आणि मतांच्या लोकांनी भाग घेतल्यामुळे त्याचीं अनेक स्वरूपें व परिणाम दिसून येतात. पहिला एक पंथ असा निघाला की, घटपटांच्या खटपटीमध्ये अर्थात् गूढ तस्वज्ञानामध्ये प्रवेश करणें ज्या सर्वसामान्य लोकांना अवघड वाटू लागेल, त्यांनी भोळ्या भक्तिभावाने ईश्वराची उपासना व धर्माचरण करावें.

 अशा लोकांसाठी सोप्या प्रांतिक प्राकृत भाषांतील ग्रंथांची आवश्यकता साहजिक उत्पन्न झाली. त्यामुळेच परंपरागत मोठमोठे तात्त्विक विषय संस्कृतसारख्या देववाणींतून सांगणारे कर्मठ पंडित आणि स्वतःच्या अन्तःस्फूर्तीचे साधे बोल सोप्या देशभाषांतून सर्वसाधारण लोकांना