पान:हिंन्दू सम्राट्.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रस्तावना

 राजापूरचे व्यासंगी शिक्षक व या ग्रंथाचे कर्ते श्री. वा० पु० हर्डीकर यांचा माझा साक्षात् परिचय नसतांही त्यांनी मला प्रारंभीचे चार शब्द लिहावयास सांगितले, तेव्हा मला त्यांचा आग्रह मान्य करण्यास संकोच वाटला. एक तर प्रस्तावना लिहिण्यास जे काही समाजांत मान्यत्व असावें लागते. ते मला आले आहे, असे मला वाटत नाही व ज्या प्राचीन भारताच्या इतिहासांतून त्यांनी आपल्या बहुतेक हिंदुसम्राटांची निवड केली आहे, त्या विषयाचा माझा गाढ परिचय नाही. बुद्रुकपणा व विषयप्रभुत्व यांपैकी दोनही बाजूंनी मी लंगडा असतांही हे चार शब्द लिहिण्यास उद्युक्त झालो, याचे कारण श्री० हर्डीकर यांच्यासारखे व्यासंगी गृहस्थ महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यांतून यथाशक्ति काम करीत असतां पुण्यासारख्या ठिकाणी राहिल्याने ज्याच्या बुद्धीला खतपाणी मिळाले व प्राध्यापकत्वामुळे सहजी अंगी जडणारी प्रसिद्धीही प्राप्त झाली, त्या मजसारख्यांनी आपापल्या मगदुराप्रमाणे दूरस्थांचा परामर्ष घेणे, हे त्यांचे कर्तव्य आहे; कारण अशा करण्याने इतस्ततः विखुरलेले व्यासंग उत्तेजन पावून वाटचालीला लागतात, असा विचार माझ्या मनांत आला व त्यांच्या विनंतीला होकार देऊन मोकळा झालो.

 'हिंदुस्थानचे हिंदु सम्राट' या चरित्रसंग्रहांत वाचकांच्या हिंदुत्वबुद्धीला आवाहन केलेले आहे. हिंदुस्थानांत हिंदुसम्राट होऊन गेले आहेत, हे मुद्दाम सांगण्याची पाळी आली आहे, त्याला काय करावे ? लेखकांनी उपोद्घातांत म्हटल्याप्रमाणे आजची हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास