पान:हिंन्दू सम्राट्.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )

 त्यांनी वेळांत वेळ काढून सुंदर व अधिकारयुक्त प्रस्तावना लिहून दिली म्हणून मी त्यांचा फारच आभारी आहें. तसेंच डॅीं० अळतेकर, एम. ए., अध्यापक हिंदु विद्यालय [काशी] ह्या प्राचीन हिंदी इतिहासाचे तज्ज्ञांनी लक्ष्यपूर्वक पुस्तक वाचून आपला चांगला अभिप्राय दिला आणि त्यांतील, चुकाही दाखवून कित्येक सुधारणा सुचविल्या, ह्याविषयी मी फार आभारी आहें. शुद्धिपत्रामध्ये त्यांनी व प्रा० पोतदार ह्यांनी सुचविलेल्या सुधारणा परिशिष्टांतून स्वतंत्रपणें दाखल केल्या आहेत. महाराष्ट्रांतील वयोवृद्ध संशोधक रावसाहेब गो० स० सरदेसाई ह्यांनीही माझें पुस्तक मोठ्या आस्थेने वाचून व सुंदर अभिप्राय देऊन मला उपकृत केलें आहे. त्याचप्रमाणे इतिहाससंशोधक प्रा० पोतदार [पुणें] ह्यांचा माझ्या विचारसरणीशीं मतभेद असूनही त्यांनी काळजीपूर्वक समग्र पुस्तक वाचून आपले विचार मला सविस्तर कळविले आणि संशोधनाचे दृष्टीने कांही दोष दाखविले, ह्याबद्दल मी त्यांचे आभार मानितों. अनेक मराठी व हिंदी इतिहासग्रंथांतून मिळालेल्या माहितीचा मला फार उपयोग झाला आहे, म्हणून त्या सर्व ग्रंथकर्त्यांचा मी अत्यंत ऋणी आहें.

 प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनाने होणारें अखिल भारतांतील ऐतिहासिक थोर पुरुषांचें ओझरतें दर्शन वाचकांस त्यांच्यासंबंधी अधिक जिज्ञासा उत्पन्न करील व त्यांना अधिक माहिती मिळविण्यास प्रवृत्त करील, अशी आशा आहे.

वा० पु० हर्डीकर,   

राजापुर ( जि० रत्नागिरी )