पान:हिंन्दू सम्राट्.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रवर्ती बाप्पा रावळ.

(५१)

राजघराण्याची कुलस्वामिनी मानतात. तसेच हारित मुनीच्या आज्ञेप्रमाणे शिवोपासना करण्यासाठी त्याने भगवान् एकलिंगजीचें मंदिर बांधिलें. नंतर त्यालाच राज्य अर्पण करून आपण केवळ श्री एकलिंगजीचा दिवाण म्हणून राज्यकारभार चालविला. पुढील वंशजांनीही त्याच भावनेने राज्य केलें. म्हणून त्यांना 'दीवानजी' अशी संज्ञा मिळाली आहे. असे म्हणतात की, वानप्रस्थ घेतल्यानन्तरही त्याने एकदा मोठी सेना घेऊन काश्मीरपासून कंदाहार-इराणपर्यंत स्वारी करून दिग्विजय केला ! मात्र पुढे स्वतः चितोडला परत न जातां त्याने चतुर्थाश्रम 'संन्यास' घेतला आणि कांही काळपर्यंत यात्रा व भगव- च्चिन्तन करून शेवटीं हिमालयामध्ये चक्रवर्ती बाप्पा रावळ ह्याने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला !

 बाप्पाचें राजघराणे अद्याप मेवाडांत 'उदेपूर' येथे राज्य करीत आहे. इस्लामी आक्रमणामुळे अनेक राष्ट्र नष्टभ्रष्ट झालीं असतां ह्या घराण्याने त्यांचेशीं पिढ्यानुपिढ्या मोठ्या अटीतटीचा सामना करून वैदिक धर्माची आणि स्वातन्त्र्याची ध्वजा आपल्या स्कंधीं धारण करून ती शक्य तितकी उंच फडकत ठेवली. आपल्या राज्याचा विस्तार केला आणि विद्या, कला आणि वैभव ह्यांनी समृद्ध असें बलशाली हिंदुराष्ट्र सन्मानपूर्वक जगविलें आहे. हिंदुसूर्य महाराणा हम्मीर, महा राणासँग, राष्ट्रपुरुष राणा प्रताप व महाराणा राजसिंह हे बाप्पाचेच वंशज होत ! ह्या सर्वांमध्ये महाराणा कुंभ हा अनेक गुणांनी परिपूर्ण असा होता. त्याने माळवा व गुजराथच्या मुसलमान सुलतानांवर जय मिळवून त्यांपैकी एकाला कित्येक महिने आपल्या कैदेत ठेविलें. ह्या विजयाच्या स्मरणार्थ 'कीर्तिस्तंभ' ही त्याने बांधला असून, तो रजपूत शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राणा कुंभ हा साहित्य व संगीत ह्यांतही निपुण असून, रसिकप्रिया व संगीतराज इत्यादि ग्रन्थ त्याने स्वतः लिहिले आहेत. औरंगजेब बादशहाला दम-