पान:हिंन्दू सम्राट्.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

आणि ते त्याला व त्याच्या अनेक वंशजांना अक्षरशः सार्थ होतें, अशी साक्ष मेवाडचा अत्यंत उज्ज्वल असा शकडो वर्षांचा इतिहास देत आहे ! सूर्यवंशी प्रभु रामचन्द्राचे ते वंशज असून, त्यांच्या ध्वजावर 'उगवता सूर्य' रेखाटलेला असतो.

 राज्यवैभवाप्रमाणे कुटुंबसौख्यही त्याला चांगल्या प्रकारचे लाभले होते. त्याचें अंतःपुर अनेक सुंदर स्त्रियांनी युक्त होतें. एका मुसलमान कन्येचें पाणिग्रहण केल्याबद्दल वर लिहिले आहेच. तिच्या संततीला सूर्य वंशी रजपूत म्हणून मान मिळतो, असें कर्नल टॉड म्हणतो. त्या अर्थी धार्मिक विधीने त्या मुलीला शुद्ध करून वेवली असावी, असा तर्क आहे. बाप्पाला पुष्कळ संतति असून, ती तेजस्वी होती. अनेक पुत्रपौत्रांनी कित्येक राज्य स्थापन केली आहेत. * ते आपणांस 'सिसोदिया' रजपूत असें म्हणवितात. त्या वशांतील सुमारे एक लक्ष लोक राजस्थानांत सापडतील ! अशा प्रकारें गृहस्थाश्रमांतील सर्व ऐहिक सुख पन्नासाव्या वर्षांपर्यंत भोगून आणि क्षात्रधर्माला उचित अशीं सर्व कर्तव्य पार पाडून वृद्धपणीं त्याने 'वानप्रस्थ' आश्रम घेतला आणि आपला पुत्र 'पहिला खोम्माण' ह्याला गादीवर बसविलें. हिंदुधर्माच्या शिकवणीप्रमाणे 'वर्णाश्रमधर्म' पाळणारा राणा बाप्पा रावळ धन्य होय ! अनेक प्राचीन हिंदु राजांच्या चरित्रांतही अशी घटना दिसून येते.

 चक्रवर्ती बाप्पा रावळ जसा परम प्रतापी होता, तसा धर्मनिष्ठ व अध्यात्मज्ञानी होता. सौराष्ट्रावरील स्वारीमधून देवी"व्यानमाता"हिची मूर्ति आणून चितोडाला स्थापिली व तीच मेवाडच्या


 'दत्तक वारस नामंजूर' म्हणून इंग्रजांनी खालसा केलेल्या अनेक राज्यांची दशा लक्ष्यांत घेतली, म्हणजे बाप्पाच्या संतति-वैपुल्याचे महत्व आजच्या लोकांनाही कळून येईल !