पान:हिंन्दू सम्राट्.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रवर्ती बाप्पा रावळ.

(४९)

 साधूच्या आशीर्वादाप्रमाणे नशीब काढण्याची संधि पुढे बाप्पा रावळ शोधूं लागला. भिल्ल मित्रांना बरोबर घेऊन तो चितोडच्या राजदरबारीं गेला. तेथील राजाने बाप्पाची तेजस्वी मुद्रा पाहून त्याला व त्या भिल्लांना सैन्यांत नोकरी दिली व कांही दिवस लोटल्यावर बाप्पाचें प्रत्यक्ष कर्तृत्व पाहून त्याला सेनापति नेमलें. लौकरच बाप्पाच्या परीक्षेची वेळ प्राप्त 'झाली ! सिंधच्या अरबांचें सैन्य चितोडनजीक येऊन ठेपलें. स्वतः राजा शूर, पण वृद्ध झालेला. सिंधकडील मजकूर लक्ष्यांत घेऊन मेवाडची दुर्दशा होऊं नये, म्हणून शरण जाण्याचा सल्ला बहुतेक जुन्या सरदारांनी दिला होता; परन्तु बाप्पाने त्या वृद्ध परन्तु मानी राजाचे मनांतील भाव ओळ-, खून आपले प्राण पणास लावून युद्ध करण्याचे निश्चित केलें ! वीर रजपुतांनी व शूर भिल्लांनीही आपल्या तरुण सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे तयारी केली.

 शेवटीं चितोडगडाचे पायथ्याशीं बाप्पाने अरब शत्रूंबरोबर तुमुल युद्ध करून विजय मिळविला आणि सिंधू नदीपर्यंत त्यांचा पाठलाग केला ! एवढ्यानेहि बाप्पाचा क्रोध शांत झाला नाही. महंमद कासीम याने सिंध- मध्ये ठेवून दिलेल्या 'सेलीम' नांवाच्या सुभेदाराचा पाडाव करून त्याचे जागीं आपल्या तर्फेचा नवीन सुभेदार नेमला आणि त्या 'सेलीम' च्या मुलाशीं लग्न लावून मोठ्या हर्षाने तो चितोडकडे परतला ! अरबांवर मिळविलेल्या ह्या मोठ्या विजयामुळे बाप्पाची चोहोंकढे कीर्ति झाली. राजाराणीने त्याचें आनन्दाने स्वागत केले व त्यानंतर लौकरच भाग्यशाली बाप्पाला मेवाडचें राज्य (इ० स० ७३०) प्राप्त झालें.

 मराठी इतिहासकार त्याला 'बाप्पा रावळ' असें म्हणतात. वास्तविक 'रावळ' किंवा 'सामन्त' ह्यांपेक्षा त्याची योग्यता फारच मोठी होती. चक्रवर्ती व सार्वभौम हे तर त्याचे किताब होतेच. खेरीज 'हिंदुसूर्य' हें सन्मानदर्शक पद धारण करून तो मेवाडच्या सिंहासनावर बसला होता !