पान:हिंन्दू सम्राट्.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४८)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

अधिपति होता. एवढी गोष्ट निर्विवाद सिद्ध होत आहे. हिंदी भाषेत त्याचें चरित्र पंडित रामशंकर त्रिपाठी ह्यांनी बरेंच परिश्रमपूर्वक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी खालीलप्रमाणे त्याची पूर्वपीठिका दिली आहे-

 चक्रवर्ती बाप्पाराव हा प्रभु रामचन्द्रापासून ऐशीवा पुरुष होता. श्री रामचंद्राचा पुत्र 'लव' हा लवपूर (लाहोर) येथे राज्य करीत होता. त्याचे वंशांतील 'कनकसेन' नामक एक पुरुष गुजराथमध्ये आला. बन्याच कालानंतर त्याच्या नामक एका वंशजाला 'ईदर' येथील राज्य प्राप्त झाले. त्यांचेपासून पुढील आठवा पुरुष 'नागादित्य' हा मरण पावला, त्या वेळी त्याला 'शैल' नामक तीन वर्षांचा पुत्र होता. तेथील राज्यांत बंडाळी माजल्यामुळे पुरोहिताने (राजगुरु) त्याला पळवून 'नागदा' गावीं नेऊन ठेवलें. तेथील लोक त्या अपरिचित मुलाला प्रेमाने बाप्पा म्हणू लागले व तेंच नांव पुढे चालले.

 लहानपणीं तो शेजारच्या जंगलांतील भिल्लांच्या मुलांशी खेळत असे. त्यांच्या सहवासाने तो तिरंदाजी, कुस्ती वगैरे शिकून शिकार करूं लागला. त्या तरुण भिल्लांमध्ये 'वालीय' आणि 'देव' हे दोघे मुख्य असून, बाप्पाचे जिवलग मित्र होते. त्यांच्याच हस्ते बाप्पाला मोठ्या समारंभाने चितोड येथे 'राजतिलक' लागला होता ! आणि ती परंपरा अजून मेवाडच्या महाराण्यांच्या राज्यारोहणसमारम्भांत श्रद्धापूर्वक चालविली जात आहे !

 नागदा गावानजीकच्या जंगलांतील एका गुहेमध्ये 'हारित' नामक ऋषि तपश्चर्या करीत होते. बाप्पाने बालपणीं त्यांची चांगली सेवा केली.. त्यामुळे संतुष्ट होऊन त्या ऋषीने बाप्पाला गुरूपदेश देऊन 'शिवा' ची (एकलिंगजी) उपासना करण्याला सांगितलें व 'तूं सार्वभौम राजा होशील' असा आशीर्वाद दिला! ह्या गोष्टीला अचलगड येथील शिलालेखावरून पुष्टि मिळते.


  • एका मराठी लेखकाने त्याचें नांव 'कालभोज' असे दिले आहे.