पान:हिंन्दू सम्राट्.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४४)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

(७) वैदिक धर्माचा पुनरुत्कर्ष

 हिंदुस्थानच्या इतिहासांत हिंदु सम्राटांचं जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ऋषि, आचार्य व साधुसन्त ह्यांचेही मानले पाहिजे; कारण त्यांच्या तपस्येची आणि तत्त्वज्ञानाची छाप परंपरेने हिंदुसमाजावर चांगलीच बसली आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्याचीं अनेक आंदोलने उत्पन्न होऊन, तीं यशस्वीही झाली आहेत. !

 वैदिक धर्म आणि बौद्धधर्म ह्यांमध्ये सुमारे एक हजार वर्षे मतपरि- वर्तनाचा शांत संग्राम चालू होता. कांही काळ बौद्धधर्माचा इतका प्रसार झाला होता की, आता वैदिक धर्म नामशेष होणार, अशी भीति कित्येकांना वाटू लागली ! अशा बिकट काळाला कलाटणी देऊन वैदिक धर्माचा उद्दार कुमारिलभट्ट आणि शंकराचार्य ह्या दोन विभूतींनी केला आहे. कुमारिल भट्टाने वेद आणि यज्ञसंस्था ह्यांच्याविषयी लोकांच्या मनांत पूज्य बुद्धि उत्पन्न करण्याचा यत्न केला. इ० स० ७०० च्या सुमारास तो होऊन गेला असावा. तो मोठा विद्वान् असून 'तंत्रवार्तिक' इत्यादि कित्येक ग्रंथ स्याने लिहिले आहेत. त्यांवरून तो उत्तर हिंदुस्थानचा (आर्यावतांतील ) रहिवासी असावा, असें विद्वानांचं मत आहे. बौद्धधर्मामुळे अहिंसा आणि संन्यास ह्या गोष्टी बऱ्याच लोकप्रिय झाल्या होत्या; त्यामुळे कुमारिल भट्टाचे पश्चात् हिंसाप्रधान आणि कर्मकांडयुक्त यज्ञयाग ह्यांचा बहुतेक लोप झाला. तरीही बौद्धधर्माला उतरती कळा लागून, त्याने केलेलें वैदिक धर्माचें पुनरुज्जीवन पुढेही अबाधित राहिलें.