पान:हिंन्दू सम्राट्.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट् हर्षवर्धन.

( ४३ )

 सम्राट् चंद्रगुप्त मौर्य) ह्याचेपासून सुमारें हजार वर्षाच्या काळामधील स्त्रीशिक्षण व स्त्रियांचा सामाजिक दर्जा ह्यांविषयी फार थोडी माहिती मिळते. तरीपण तेवढ्यावरूनही त्या काळामध्ये हिंदु स्त्रियांचें शहाणपण 'केवळ चुलीपुरतेंच' रहात नसे, असे म्हणतां येतें. अशोकाची राणी 'कारुवाक्या' तसेंच शातकर्णी राजाची माता 'गौतमी बालश्रीं' ह्यांच्या नांवाचे लेख मिळाले आहेत. हर्षाची बहीण राज्यश्री ही कैदेतून धीटपर्णे पळून गेली. पुढे ती भावाबरोबर धर्मसभेत बसून सर्व वादविवाद ऐकत बसे. तसेंच राज्यकारभारांतहि ती हर्षवर्धनाला साह्य करीत असे. श्रीमत् शंकराचार्य आणि मंडनमिश्र ह्यांच्या वादामध्ये मंडनमिश्राची पत्नी हिने 'पंच' ह्या नात्याने काम केलें ! ही गोष्ट सर्व हिंदु बंधु-भगिनींना अभिमानास्पद वाटेल, यांत शंका नाही.

 इ० स० ६४६ ह्या वर्षी सम्राट् हर्षवर्धन ऊर्फ शिलादित्य स्वर्गवासी झाला. त्याचे पश्चात् त्याला पुत्र नसल्यामुळे त्याच्या प्रधानाने कांही दिवस त्याचें राज्य चालविलें होतें, असो. प्राचीन हिंदु सम्राटांमध्ये 'हर्षवर्धन' हा शेवटचा प्रसिद्ध सम्राट् होय. बगदाद येथील विख्यात खलीफा हरून-अल- रशीद किंवा खलीफा 'मामून' ह्यांचशीं शौर्य, प्रजाप्रेम आणि विद्येची आवड इत्यादि बाबतींत हर्षवर्धनाचें साम्य दिसून येतें.