पान:हिंन्दू सम्राट्.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४२)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

 सम्राट् हर्षवर्धन हा चांगला विद्वान् होता. त्याने रचिलेलें 'नागानंद' नाटक सुप्रसिद्ध आहे. त्याखेरीज 'प्रियदर्शिका' व 'रत्नावली' हे दोन्ही ग्रंथ- ही त्यानेच लिहिले असावेत. तो केवळ 'पुस्तकांतला किडा'च नव्हता, तर साहित्याप्रमाणे चित्रकलेतहि तो चांगला ज्ञाता होता. ह्याविषयीं "बांसखेडा' येथील एक तत्कालीन लेखामध्ये उल्लेख सापडतो. त्याचे पदरीं बाणभट्ट, पुलिंदभट्ट, दंडी, मयूर आणि मातंग दिवाकर इत्यादि कित्येक पंडित असत. नालंद, कनोज, प्रयाग, गया इत्यादि ठिकाणीं हर्षाच्या राजवटींत फार मोठीं विद्यालयें होतीं. त्या सर्वात नालंद येथील विद्यालय फार प्रसिद्ध असून, त्याचे खर्चासाठी सम्राट् हर्षवर्धनाने शंभर गावें इनाम दिलीं होतीं. येथील विश्वविद्यालयाची इमारत सहा मजली व फार भव्य होती. तिजमध्ये दहा हजार विद्यार्थांची सोय होती. तेथे दररोज निर निराळ्या शंभर विषयांवर मोठमोठ्या पंडितांचीं प्रवचनें होत असत.

 बौद्ध धर्माच्या अभ्यासाखेरीज सांख्य, योग, न्याय इत्यादि शास्त्रांचें व त्याचप्रमाणे तर्कशास्त्र, चिकित्साविद्या अशा अनेक विषयांचे शिक्षण देण्यासाठी वेगवेगळीं दालने त्या विद्यालयामध्ये ठेवलीं होतीं. त्या विद्यालयाचा 'शीलभद्र' नामक एक पंडित कुलगुरु असून, स्वतः हर्षवर्धन हा कुलपति अर्थात् तेथील दहा हजार विद्यार्थीमंडळींना अन्नवस्त्र देणारा धनी होता. ह्या शिक्षणपद्धतीची श्रेष्ठता वर्णितांना हिंदी कवि मैथिली- शरण गुप्त म्हणतात-

पढ़ते सहस्रों शिष्य हैं, पर फीस ली जाती नहीं।
यह उच्च शिक्षा तुच्छ धनपर, बेच दी जाती नहीं ॥१॥

 आजकाल शिक्षणप्रसार व त्याचा वाढता खर्च, ह्यांसंबंधी अभिनव कल्पनांमध्ये गर्क असणान्या आमच्या पुढाऱ्यांनी ह्या प्राचीन इतिहासा- पासून पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे.