पान:हिंन्दू सम्राट्.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट हर्षवर्धन.

(४१)

युएनत्संग हर्ष राजाबद्दल लिहितो-
 “सम्राट् हर्षवर्धन (शिलादित्य) ह्याचेजवळ पांच हजार हत्ती, वीस हजार स्वार व पन्नास हजार पायदळ होत. त्याच्या जोरावर सुमार चाळीस वर्षे निर्वेधपणे त्याने साम्राज्याचा कारभार केला.

 “राज्याची पाहणी करण्यासाठी तो दौरे काढी आणि त्या वेळीं गवती झोपड्यांत तो रहात असे, त्याचा न्याय चोख असे. प्रजेच्या कल्याणासाठी तो अहर्निश झटत असे. गरिबांना तो दानधर्मही फार करी. त्याची राजधानी कनोज पांच मैल लांब असून, सभोवार भव्य तटबंदी होती.. उंच प्राकार, रम्य बागा आणि वस्तुसंग्रहालयें इत्यादिकांमुळे शहर फारच सुंदर दिसत असे. "

 सम्राट् हर्षवर्धन हा शैव हिंदु होता. एका ताम्रपटलेखामध्ये त्याला ‘परम माहेश्वर' म्हटले आहे. त्याने दिग्विजयाला निघण्यापूर्वी महेश्वराची पूजा केली होती, असें त्याच्या चरित्राचा लेखक 'बाणभट्ट' म्हणतो; परन्तु बहिणीच्या ( राज्यश्री ) सहवासामुळे हळूहळू त्याच्या मनाचा कल बौद्ध धर्माकडे झाला असावा. त्याने आपल्या प्रजेला धर्माच्या बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य दिलें होतें. दर पांच वर्षांनी मोठा समारंभ करून त्यामध्ये विद्वान् लोकांना बोलावून तो धर्मचर्चा करी. अशा एका समारंभांत ह्युएनत्संग ह्याला हर्षाने मोठ्या मानाचे स्थान दिले होतें. समारंभानंतर उदार बुखीने ब्राह्मण, बौद्ध व जैन साधुसंतांना तो देणग्या देत असे. अशा एका प्रसंगी त्याच्याजवळचें सर्व द्रव्य संपले आणि स्वतःला पांवरण्याला वस्त्रदेखील उरलें नाही ! शेवटीं बहिणीजवळून एक भगवे वस्त्र त्याने पांघरण्यासाठी मागून घेतलें ! अशा रीतीने निष्कांचन होण्यांत हर्षराजाला मोठा आनंद होत असे. स्वपराक्रमाने राज्यवैभव कमावून 'कर्णा'लाही लाजविणाया उदार अंतःकरणाने त्याचा व्यय करणारा असा राजा अन्य देशांच्या इतिहासांत क्वचित् सापडेल !