पान:हिंन्दू सम्राट्.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(२०)

हिन्दुस्थानचे हिन्दु सम्राट्.

चालत असल्यामुळे 'चंद्रगुप्त व अशोक ' ह्यांचीं साम्राज्यें 'राजा करील तो पूर्व दिशा' अशा स्वरूपाचीं नव्हतीं, असें कोणालाही कबूल करणें भाग पडेल.

क्रमांक ७ च्या स्तंभलेखामध्ये पुढील वर्णन आहे-

 'रस्त्याच्या काठाने छायेसाठी वडाचीं व आंब्यांचीं झाडें लावलीं आहेत. एक मैलाचे अन्तराने विहिरी खोदविल्या असून, प्रवाशांचे सोईसाठी अनेक धर्मशाळा व अन्नसत्रें ह्यांची व्यवस्था केली आहे. गरीब लोकांसाठी व त्याचप्रमाणे जनावरांसाठी दवाखाने घातलेले होते. तक्षशिला व नालंदा येथील विश्वविद्यालयांच्या प्रगतीसाठी त्याने फार परिश्रम केले. व्यापारवृद्धीकडे लक्ष्य देऊन ग्रीस व इजिप्त ह्यांचेशीं दळणवळण ठेविलें. ह्यावरून त्याचें प्रजावात्सल्य दिसून येतें.

 'राज्यवैभवाच्या निदर्शक अशा सुंदर व भव्य इमारती बांधण्याकडे त्यांचे फार लक्ष होतें. त्याच्या राजवाड्याचें वर्णन पांचव्या शतकामध्ये इकडे आलेला चिनी प्रवासी ' फाहियान ' ह्याचे शब्दांत देत आहें-

 'अशोकाचा राजवाडा पाहून मी थक्क झालों ! इतकें सुंदर बांधकाम करण्यासाठी त्याने 'यक्षा ' सारख्या दैवी कारागिरांचीच योजना केली होती कों काय कोण जाणें !'

 गिरनारसारख्या पर्वतांवरील प्रचंड खडकांच्या पृष्ठभागीं आपल्या आज्ञा कोरून ठेवणा-या धर्मनिष्ठ सम्राटाचें कौतुक करावें तेवढें थोडेच ! तसेंच अनेक भव्य स्तूप, मठ, विहार वगैरे त्याचीं बांधकामें फार सुंदर आहेत. त्यांमध्ये चौदा शिलालेख व सात स्तंभलेख प्रसिद्ध आहेत. अशोकाच्या 'कारुवाक्या' नामक एका राणीचाही शिलालेख सापडला आहे. ह्या बहुतेक लेखांची भाषा 'पाली' असून, त्या भाषेंत स्थानपरत्वें कचित्