पान:हिंन्दू सम्राट्.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राट् अशोक.

(१९)

ह्या इतिहासतज्ज्ञाच्या मतें अशोक शैव हिंदू होता व नंतर त्या वेळच्या चाललेल्या ओघाप्रमाणे तो बौद्ध झाला. मात्र त्याचें मतांतर हिन्दू प्रजेला अनिष्ट किंवा दुःखदायक झालें नाही. सम्राट् चंद्रगुप्ताप्रमाणे त्यानेही प्रजेला समतेने वागविलें; इतकेंच नव्हे तर त्याच्या धार्मिक प्रवृत्तीचा एकन्दर राज्यकारभारावरही अत्यंत इष्ट परिणाम झाला.

 सम्राट् अशोक हा राजा ह्या नात्याने प्रजेची ऐहिक व पारमार्थिक अर्थात् नैतिक उन्नति करणें आपलें कर्तव्य मानीत असे. आपल्या अधिका-यांनी फिरतीवर गेल्यावेळीं ठिकठिकाणीं सभा भरवून लोकांना धर्मनीति-सदाचार ह्यांचें शिक्षण द्यावें, अशा प्रकारचे हुकूम त्याने दिले होते. तशा रीतीच्या प्रयत्नामुळे समाजांतील 'गुन्हे करण्याची प्रवृत्ति ' कमी होऊं लागली व सर्व प्रजा गुण्यागोविंदाने नांदूं लागली ! फ्रान्स देशांतील विख्यात पुरुष नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे की, वास्तविक 'राज्यकारभार' म्हणजे दुसरें कांही नसून, 'सर्वांच्या हितांत व्यक्तीचें हित आहे, ह्या गोष्टींचें लोकांना शिक्षण देणें' म्हणजे 'राज्यकारभार' होय ! हें तत्व येथे उत्कृष्ट रीतीने सिद्ध होत आहे.

 राज्यव्यवस्थेच्या सोयीसाठी त्याने पंजाब, माळवा, कलिंग व कर्नाटक असे साम्राज्याचे विभाग केले होते. त्यामध्ये अनुक्रमें तक्षशिला, उज्जनी, तोसाली व सुवर्णनगरी ( म्हैसूर ) अशों मुख्य नगरें असून, तेथे प्रान्ताधिकारी रहात. त्यांचे हातीं कारभाराचे शिस्तीसाठी पुष्कळ सत्ता दिलेली होती; तरीही धार्मिक चालिरीतींमध्ये धर्माधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना कांही ढवळाढवळ करतां येत नसे. तसेंच ग्रामपंचायत किंवा जातीचे पंच ह्यांच्या निर्णयांतही ते हात घालीत नसत. स्वतः सम्राट् अशोकही दौरा काढून सर्वत्र नजर ठेवीत असे. त्यालादेखील महत्त्वाच्या कामीं सल्ला देणारी एक मंत्रिमंडळाची संस्था होतीच. अशा प्रकारें सर्व काम