पान:हिंन्दू सम्राट्.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१६)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्.

प्रशस्त व प्रचंड सडक बांधलेली होती. डांक नेण्याआणण्याची व्यवस्था घोडेस्वारांचे द्वारें होत असे. चोरीचें भय फार कमी असे. लोक साधे व सुखी होते. लोकांचा परस्परांवर विश्वास असे. मद्यपानासारख्या व्यसनांचें प्रमाणहि अल्प असे. त्यामुळे न्यायालयांत कज्जे घेऊन जाण्याचा प्रसंग क्वचितच कोणाला येई. संस्कृत भाषेला विशेष मान असून पाली व मागधी इत्यादि भाषांचा उदय होत होता. शिक्षणामध्ये धार्मिक वाङमयाचा अभ्यास प्रामुख्याने होत असे. अर्थशास्त्रावरील आर्यचाणक्याचा सुप्रसिद्ध ग्रंथा चंद्रगुप्ताचे कारकिर्दीतच झालेला असून, त्याचे अनुरोधाने त्या वेळची बहतेक राज्यव्यवस्था चालत असे.

 अशा प्रकारें ऐतिहासिक कालांतील पहिल्या भारतीय साम्राज्याची स्थापन करणारा सम्राट चंद्रगुप्त हा पंचवीस वर्षे उत्तम रीतीने राज्य करून, ख्रिस्तपूर्व २९८ ह्या वर्षी स्वर्गवासी झाला. त्याचे पश्चात त्याचा पुत्र ‘बिंदुसार' ह्याने राज्यसूत्रे आपल्या हातीं घेतली.