पान:हिंन्दू सम्राट्.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राट् चंद्रगुप्त मौर्य.

(१५)

प्रतिनिधींची मोठी सभा होती. राजधानी पाटलिपुत्र व त्यासारख्या कांही मोठ्या शहरांतून सुमारें तीस सभासदांची एक संस्था (म्युनिसिपालिटी) असून ती स्थानिक अंतर्गत व्यवस्था पाही. दररोज राजसभेंत येऊन चंद्रगुप्त न्यायदानाचें काम करी. धार्मिक दृष्टया तो ‘शैव' हिंदु होता, असें पं० गौरीशंकर ओझा ह्यांच्यासारख्या विद्वानांचें मत आहे; पण जैन वाड्मयाच्या आधारें तो जैन मताचा अनुयायी होता, असेंही कोणी म्हणतात. स्वतः चंद्रगुप्त कोणत्याही मताचा असला, तरी हिंदु, बौद्ध, जैन इत्यादि सर्व धर्माच्या लोकांना तो समभावाने वागवीत असे. राज धानी पाटलिपुत्र हें शहर नऊ मैल लांब व दोन मैल रुंद असून त्याचे भोवताली भव्य तटबंदी होती. तटाला ६४ दरवाजे होते. तटाबाहेर प्रचंड खन्दक असून, तो शोणनदीच्या पाण्याने भरलेला असे.

 चंद्रगुप्ताचे राजवाडे शहराचे मध्यभागीं असून, आपल्या सौंदर्याने व भव्यतेने शहराची शोभा वाढवीत होते. त्या वेळच्या प्रसिद्ध इराणी राजमहालांपेक्षाही ते शोभिवंत होते, असें तत्कालीन प्रवाशांचें मत आहे. त्यावरून भारतीय शिल्पकलेची प्रगति त्या वेळीं किती झाली होती, हें दिसून येतें. देशामध्ये मुख्य धंदा शेती असून, तिच्या भरभराटीकडे सरकारचें विशेष लक्ष्य होतें. शेतीच्या उपयोगासाठी अनेक कालवे बांधपयांत आले होते. त्यांपैकी 'सुदर्शन झील' नामक काठेवाडांतील तलावासम्बन्धी कांही माहिती शकांचा राजा 'रुद्रदामनू' ह्याच्या एका शिलालेखावरून मिळते. उभ्या पिकाचा चौथा हिस्सा सरकारी कर घेतला जात असे. युद्धप्रसंगीदेखील शेतें व झाडी ह्यांना उपद्रव न होण्याची राजेलोक खबरदारी घेत असत. शेतीखेरीज कापड विणणें, कातडीं कमावणें, धातूंच्या खाणी चालवणें, इत्यादि अनेक धंदे देशभर चालत असत.

 दूरदेशीं व्यापार करण्यासाठी हिंदू लोकांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत असे. राजधानीपासून पश्चिमेस ‘तक्षशिला' नगरीपर्यंत एक