पान:हिंन्दू सम्राट्.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(१२)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट.

म्हणूं शकेल, परन्तु तसें मानलें तरीदेखील शिकंदरची पंजाबवरील स्वारी आणि नंतर पुनः लौकरच झालेली ‘सेल्युकस् निकेटर' ह्याची स्वारी अशा दोन प्रसंगांची व त्यांच्या परिणामांची जर तुलना केली, तर चंद्रगुप्त-चाणक्यांनी केलेली राज्यक्रांति भारतीय राष्ट्राच्या हिताचीच झाली, असें दिसून येईल. देशांतील जी व्यक्ति किंवा जो व्यक्तिसमुदाय (पक्ष) निरंतर जागृत राहून आपल्या देशाचा गौरव वाढविण्याला समर्थ असेल, ती व्यक्ति किंवा तो पक्ष आधिकारारूढ होणें हें योग्यच मानलें पाहिजे व अशा वेळीं होणा-या स्थानिक अस्वस्थतेला इष्टापति असेंच सहजलें पाहिजे, हें उघड आहे.

 जगज्जेता अलेक्झांडर दि ग्रेट ऊर्फ शिकंदर ह्याने ख्रिस्तपूर्व ३२५ ह्या वर्षी तुर्कस्थान-इराणकडून दिग्विजय करीत शेवटीं पंजाबप्रांतावर स्वारी केली. पंजाबांतील राज्यें जिंकल्यानंतर गंगेच्या काठाने पूर्वेकडे जाण्याचा त्याचा विचार होता; परन्तु मगध देशांतील 'नंद' राजे प्रबल असल्यामुळे आणि सैन्यही त्या दीर्घकाल चाललेल्या स्वारीमुळे कंटाळल्याकारणाने पंजाबमध्ये आपला ग्रीक सरदार ठेवून तो परत गेला. त्याची पाठ वळल्याबरोबर त्या सरदाराला हाकून देऊन ग्रीकांची सत्ता नष्ट करण्याचा पंजाबी लोकांनी यत्न सुरू केला. त्या प्रसंगीं त्या स्वातन्त्र्यप्रिय लोकांचें नेतृत्व तरुण चंद्रगुप्ताने स्वीकारलें. 'तक्षशिला' घेऊन पंजाबवर आपलें वर्चस्व त्याने स्थापन केलें. नंतर त्या प्रदेशांतील 'पर्वतक' नावाच्या एका राजाचें साह्य घेऊन चंद्रगुप्ताने मोठे सैन्या जमविलें आणि आर्यचाणक्याच्या सल्ल्याने मगध राज्यावर स्वारी केली. युद्धामध्ये चाणक्याने अनेक कारस्थानें केलीं. शेवटीं नंद राजांचा पुरा नाश होऊन ख्रिस्तपूर्वी ३२२ ह्या वर्षी भाग्यशाली 'चंद्रगुप्त' मगधाचा अधिपति झाला! नंतर चाणक्य आणि 'राक्षस' ह्या नांवाचा नंदांचा प्रधान, ह्यांच्या साह्याने ह्या नूतन राजाने आपल्या राजवटीला योग्य वळण दिलें,