पान:हिंन्दू सम्राट्.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सम्राट् चंद्रगुप्त मौर्य.

(११)

 चंद्रगुप्साच्या चरित्राशीं 'आर्यचाणक्य’ ह्याचा वेळोवेळीं सम्बन्ध येत असल्यामुळे त्याची थोडी माहिती येथे दिली असतां विषयान्तर होणार नाही. चंद्रगुप्ताच्या पूर्वी पाटलिपुत्र (पाटणा) येथे 'नंद' वंशांतील पराक्रमी हिंदु राजे राज्य करीत असून, सर्व राजेराजवाड्यांमध्ये ते प्रबल मानले जात असत. त्यांनी एकदा कांही अपमान केल्यामुळे 'आर्यचाणक्य' त्यांचा सूड उगवण्याची संधि पहात होता.* त्यासाठी एखादा राजपुत्र हाताशीं धरून मगध राज्यामध्ये क्रांति घडवून आणावी, अशा विचारांत तो हिंडत असतां वर सांगितल्याप्रमाणे चलाख व तरतरीत बाल 'चंद्रगुप्त' त्याला सुदैवाने मिळाला.

नंतर चाणक्याचें चातुर्य आणि तरुण चंद्रगुप्ताचें शौर्य हीं एकाच उद्दिष्टासाठी एकत्रित झाली. ह्या कर्तृत्ववानू गुरुशिष्यांना ग्रीक बादशहा शिकंदर ह्याच्या स्वारनंतर झालेल्या पंजाबमधील बेबंदशाही व बंडाळीमुळे एक सुवर्णसंधीच चालून आली ! तिचा फायदा घेऊन बलाढ्य 'नंद' राजांचा पराभव करून मगधाचें राज्य मिळविण्याचे कामीं वीर चंद्रगुप्ताला चाणक्याच्या मुत्सद्देगिरीचें अप्रतिम साह्य झालें आणि त्यानंतरदेखील राज्यकारभारांतील व्यवस्थितपणा व राजकीय धोरण इत्यादि बाबतींत चंद्रगुप्ताला आर्यचाणक्याचा फार उपयोग होत असे. चंद्रगुप्त व चाणक्य ह्यांनी घडवून आणलेली राज्यक्रांति ही कदाचित कोणी स्वार्थमूलकही

 *'नंद' राजांबद्दल अप्रीति उत्पन्न होण्याचें कारण अशा प्रकारचें वैयक्तिक व क्षुल्लक नव्हतें, तर पंजाबवरील ग्रीकांच्या स्वारीची खबर दूर असलेल्या 'नंद' राजांस देऊन त्यांना ग्रीकांविरुद्ध युद्धाला प्रवृत्त करावें आणि देशाचें स्वातंत्र्य राखावें, अशा हेतूने आर्यचाणक्य पाटलिपुत्राला गेला; परन्तु तें नंदांनी मनावर न घेतल्यामुले तो रुष्ट झाला, असेंही कोणी म्हणतात.