पान:हिंन्दू सम्राट्.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(६)

हिंदुस्थान्चे हिंदु सम्राट्.

दीनदशेमुळे निराश होण्याचेंहि कारण नाही. जगाच्या इतिहासांत असा क्वचितच एखादा देश किंवा समाज अढळेल की, भरतीओहोटीच्या सृष्टिक्रमाप्रमाणे ज्याला कांही काळतरी पारतंत्र्याच्या कुंद वातावरणांत रखडावें लागलें नाही ! आजची संपन्न व बलाढ्य अमेरिका दोनशे वर्षांपूर्वी इंग्लंडच्या ताब्यांत होती; अफाट साम्राज्याचा धनी इंग्लंड देश एका काळीं रोमन साम्राज्याचा एक विभाग होता ! आणि तोच इटली (रोमन) कांही काळ ऑस्ट्रियाच्या पंजाखाली चेंगरून गेलेला होता ! ग्रीस, तुर्कस्थान व इराण ह्यांच्या इतिहासांतहि कांही दिवस सासूचे तर कांही सुनेचे आले असल्याचें दिसून येतें. मग तसे कांही दुर्दिन हिंदुस्थानच्या वाटणीला आले, तर त्याच्याच कपाळीं नालायकीचा शिक्का काय म्हणून?

 परकीयांचीं आक्रमणें केवळ हिंदुस्थानवरच झालीं आहेत, असें नाही; किंवा त्या आक्रमणांमध्ये नेहमी हिंदूंनीच हार खाल्ली असेंहि नाही. परकीयांना नामोहरम करून त्यांजकडून आपला फायदा करून घेणारेहि अनेक हिंदु राजे आमच्या गत इतिहासामध्ये होऊन गेले आहेत. त्यांच्याप्रमाणे धर्म, तत्वज्ञान व इतर शाखें इत्यादि विषयांतहि जगद्वंद्य असे अनेक थोर पुरुष आमच्या देशांत होऊन गेले आहेत. त्या सर्वांच्या पुण्यप्रतापामुळे अनेक संकटांतून निभावून 'हिंदु संस्कृति' अद्याप टिकून राहिली आहे.

 खरोखर विचार करतां हिंदु जातीच्या इतिहासाला ख्रिस्ती सनापूर्वी हजारो वर्षांपासून सुरवात झाली आहे. ज्याला आज 'ऐतिहासिक काल' म्हणून संबोधितात, त्याच्यापूर्वीहि अत्यंत अभिमानास्पद असा आमचा इतिहास पूर्वजांनी घडविलेला आणि लिहून ठेवलेला आहे. त्या अति प्राचीन काळाचे 'वैदिक काल', 'उपनिषत्काल’, ‘रामायणकाल’, ‘महाभारतकाल’ इत्यादि अनेक भाग विद्वान् शोधकांनी कल्पिले आहेत. आमच्या अनेक ग्रंथांमधून जागजागीं सूर्यवंशांतील 'रघुराजा' व 'श्रीरामचन्द्र' किंवा