पान:हिंन्दू सम्राट्.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.

(५)

नगर' येथील 'हिंदु साम्राज्या' संबंधी तरी विद्यार्थ्यांना कितीशी माहिती दिली जाते ? मग बृहदभारतामधे विकास पावलेल्या आमच्या विद्याकलादिकांची आणि जावा, सुमात्रा इत्यादि द्विपांतरांमधून झालेल्या प्राचीन हिंदु वसाहतींची ओळख तरी कोठून होणार? ह्यापुढे ज्या थोड्याशा भाग्यवानू मुलांना दुय्यम किंवा उच्च प्रतीचें शिक्षण मिळू शकतें, त्यांना इंग्लंड, ग्रीस, जपान इत्यादि देशांचा किंबहुना जगाच्या इतिहासाचाही थोडाबहुत परिचय होऊं शकतो; परन्तु स्वदेशाविषयीच्या ऐतिहासिक ज्ञानांत-कांही जिज्ञासु विद्यार्थी वगळले तर-विशेष भर पडू शकत नाही असें म्हटलें तर फारसें धाडसाचें होणार नाही.

 अर्थातच 'हिंदुस्थानचा इतिहास' हे शब्द उच्चारतांच प्रायः गजनवी महमुदाच्या स्वा-यांपासून आजपर्यंतचा म्हणजे हिंदूंच्या अंतःकलहाचा, गाफीलपणाचा आणि फलस्वरूप जाचक पारतंत्र्याचाच इतिहास झटकन डोळ्यांपुढे उभा राहतो ! लहानपणापासून झालेलें हें अपूर्ण ज्ञान आणि तजन्य गैरसमज आजन्म वज्रलेपच होऊन बसतो; कारण पुढील आयुष्यक्रमामध्ये बिकट जीवनकलहांतील कामांमुळे किंवा रिकामपणाचा वेळ घालवण्याचीं अनेक मोहक साधनें हल्ली उपलब्ध झालीं असल्यामुळे ह्या विषयाकडे सर्वसामान्य लोकांचें लक्ष्य जात नाही. अशा प्रकारें विपर्यस्त व स्फूर्तिशून्य अशा ह्या इतिहासाच्या अभ्यासामुळे लहानपणींच 'निराशा' आणि 'स्वजनांविषयी तिरस्कार' इत्यादि भावनांची छाया आमच्या तरुण पिढीवर पडू लागते! आणि त्यामुळे आत्मविश्वासाचा व कर्तृत्वाचा अभाव होऊं लागतो; ही एक राष्ट्राची हानीच होय!

 आता हिंदी लोकांचा व त्यांच्या गत इतिहासाचा कोणी कितीहि अभिमानी असला, तरी त्याला ही गोष्ट कबूल करणें भाग आहे की, आमच्या कांही दुर्गुणांचें कठोर प्रायश्चित्त आम्हांला पारतन्त्र्याच्या रूपाने अनेक शतकें भोगावें लागत आहे; परन्तु अशा कांही दोषांमुळे व चालू