पान:हिंन्दू सम्राट्.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४)



(२)

 हिंदूंच्या पराक्रमाची, कर्तबगारीची आणि संस्कृतीची कल्पना सामान्य वाचकांना येण्याला 'हिंदुस्थानचे हिंदु सम्राट' ह्या पुस्तकाचा फार चांगला उपयोग होईल. मुंबई विश्वविद्यालयामध्ये अद्यापि प्राचीन हिंदु इतिहास व संस्कृति ह्या विषयाच्या अभ्यासाला कोठेच स्थान दिले गेले नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांची उज्ज्वल संस्कृति आणि अभिनंदनीय पराक्रम यांची माहिती सुशिक्षित लोकांनाही फारशी नसते. प्रस्तुत पुस्तक लिहून ह्या बाबतींतील बहुजनसमाजाचे अज्ञान अंशतः तरी नाहीसे करण्याचा प्रयत्न श्री. हर्डीकर यांनी केला आहे. तो जितका स्तुत्य आहे, तितकाच यशस्वीही झाला आहे.

 ग्रंथकाराने सम्राटांची निवड अशा कौशल्याने केली आहे की, सदरहू पुस्तक समग्र वाचल्याने वाचकांना हिंदूंच्या इतिहासाची इ० स० पू० ३५०. ते इ. स. १७०० पर्यंतच्या काळाची ठोकळ मानाने कल्पना येईल, राजकीय घडामोडींबरोबर ग्रन्थकाराने सांस्कृतिक व धार्मिक विषयांचीही चर्चा केली आहे व त्यामुळे वाचकांना एकंदर हिंदु समाज, त्याचे अंतरंग व ध्येये ह्यांची चांगली कल्पना येईल. आपल्या मुलांपुढे योग्य आदर्श ठेवले जावेत, त्यांच्या अंतःकरणांत स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान प्रज्वलित व्हावा, त्यामुळे त्यांच्या आयुष्याला योग्य वळण लागावे, अशी इच्छा असणा-या प्रत्येक हिंदु पालकाने हे पुस्तक आपल्या मुलांना वाचावयास दिल्याखेरीज राहूं नये.

 पुस्तकामध्ये काही किरकोळ चुका आहेत; परन्तु त्यामुळे त्याच्या मुख्य उद्देशाला बाध येत नाही.

डॉ० अनंत सदाशिव अळतेकर, एम्. ए., एलएल. बी., डी. लिट.

प्राचीन हिंदी इतिहास व संस्कृति ह्या विषयाचे 'मणीदचन्द्र

नंदी' अध्यापक हिंदु विश्वविद्यालय, काशी.