पान:हिंन्दू सम्राट्.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३)



अभिप्राय.
(१)

 'हिंदुस्थानचे हिंदु सम्राट् ' ह्या नांवाचे शंभर पृष्ठांचे पुस्तक रा. वामन पुरुषोत्तम हर्डीकर यांनी अभिप्रायार्थ पाठविलेले वाचून पाहिले. मुसलमानांच्या आगमनापासून किंबहुना सिकंदर बादशहाच्या स्वारीपासून हिंदु लोक परकीय हल्ल्यांपुढे नेहमीच हार खात आले आहेत, असा पुष्कळ बाह्य लेखकांचा व तदनुसार आमच्यांतील जाणत्यांचाही अवास्तव समज बनलेला प्रचलित आहे. हा समज सर्वश्रा चूक असून, हिंदु आर्यांनी स्वराष्ट्राच्या संरक्षणार्थ पराकाष्ठेचे श्रम करून आपलें क्षात्रतेज हजारो वर्षेपावेतों भरपूर प्रकट केले आहे, हा प्रकार विद्यार्थी दशेपासून अभ्यासकांच्या मनावर ठसणे अत्यंत अवश्य आहे. याच विषयावर एक सुंदर लेख श्री. अरविंद घोष यांनी सुमारे वीस वर्षांपूर्वी मॉडर्न रिव्हयूँत लिहिलेला मी मोठ्या आस्थेने वाचला. तेव्हापासून या विषयासम्बन्धाने माझे मनांत जो नवीन प्रकाश उत्पन्न झाला, त्याचाच अनुवाद श्री. हर्डीकर यांच्या पुस्तकांत उतरलेला पाहून मला संतोष वाटतो.

 ह्या लहानशा पुस्तकांत त्यांनी कित्येक ठळक ठळक राष्ट्रपुरुषांची चरित्रे देऊन वरील मिथ्या ग्रह सप्रमाण खोडून काढला आहे. येणेकरून आपल्या तरुण पिढीला नवीन स्फूर्ति प्राप्त होण्याला पुष्कळ मदत होईल; कारण निराशेचे पटल होतकरू पिढीवर उत्पन्न होणे बिलकुल उपयोगी नाही. पुस्तकांत वर्णिलेले हिंदु सम्राटांचे नानाविध पराक्रम वाचकांनी ध्यानात ठेविल्यास राष्ट्रकार्याचे निकडीचे एक अंग सिद्धीस जाईल आणि ह्याच दृष्टीने मी या पुस्तकाचे अभिनन्दन करून, त्याचे प्रयोजन सिद्धीस जाईल, अशी आशा व्यक्त करितों.

 सम्राट् शब्दांत फक्त राज्यकर्त्यांचा समावेश न करितां शंकराचार्य, नानक इत्यादि नैतिक विजेत्यांचाही त्यांत अन्तर्भाव करण्यांत आला, हे युक्तच आहे.

ता० १२।९।१९३९
गो० स० सरदेसाई (कामशेत, जि. पुणे.)