पान:हिंन्दू सम्राट्.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपसंहार.

(९७)

नैणसी' हाच राजस्थानचा आधुनिक इतिहासकार होय; असें म्हणून कर्नल टॉडचें उच्चपद त्याला दिले आहे. विजयनगरच्या राज्याविषयी 'आमुक्त माल्यदा ' व मराठी राजांच्या बखरी हे सारे हिंदुजातीचे इतिहासच होत. त्यांचा अभ्यास करून नवीन धर्तीवर इतिहास लिहिणें हें सुशिक्षित व इतिहासप्रेमी लोकांचें कर्तव्य आहे.

२. राष्ट्रीय भावना.

 आपल्या लोकांना 'राष्ट्र' विषयक भावना माहीत नव्हती. ती इंग्रजांच्या एकछत्री अंमलामध्ये शिक्षण व वृत्तपत्रे इत्यादिकांमुळे अली- कडेच उत्पन्न होऊं लागली आहे, असा दूसरा आक्षेप आहे. पूर्वीपेक्षा दूरदूरच्या प्रांतांतील लोकांचें दळणवळण परस्परांश हल्ली वाढले आहे, ही गोष्ट खरी आहे; पण राष्ट्रीयत्वाची मुख्य खूण ' स्वदेश- स्वधर्म- स्वभाषा ' ह्यांविषयी अभिमान हीच होय ! ह्या कसोटीवर आपल्या मनोवृत्ति लावून पहाव्या, म्हणजे आपण कोठे आहों, हे कळून येईल.

 खऱ्या राष्ट्रभावनेसाठी समकालीन लोकांचा राग सोसून सामान्य लोकांकरिता ज्ञानेश्वरांनी संस्कृतांतील 'भगवद्गीता' मराठींत आणली आणि शिवाजीने अष्टप्रधानांचीं फारसी नांवें बदललीं, किंवा फसली वगैरे परकीय सन बंद करून स्वतःचा 'राजशक चालू केला.आपल्या समाजांत येऊन मिळण्यासाठी बजाजी निंबाळकर शुद्ध झाला आणि स्वधर्मव्यागापेक्षा संभाजीने मरण पत्करिलें ! छत्रपति जाग्यांवर नसतां स्वदेशासाठी मराठे वीर सतत पंचवीस वर्षे लढले. त्यांच्या राष्ट्रीयत्वाला 'सूर्याजी पिसाळ ' सारख्याचें नांव पुढे करून जर कोणी दोष देईल, तर तो त्याचा क्षुद्रपणा सिद्ध करण्याला अनेक खंडो बल्लाळ पुढे येतील !

 आता हिंदु समाजाला प्रिय अशी संस्कृतिविषयक ऐक्यभावना सर्व