पान:हिंन्दू सम्राट्.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(११)

करणे अशक्य किंवा गैर कां वाटावे ? अल्पसंख्याकांनी हिंदूंना ते बहुसंख्य हिंदु म्हणून विरोध करावा, राष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा बोलावी व हिंदूंनी स्वसंस्कृति व स्वदेश यांच्या संरक्षणासाठीदेखील हिंदुत्वास आवाहन करूं नये, हा न्याय कोठला? हिंदुधर्म व संस्कृति ही निरनिराळ्या स्थित्यंतरांतून गेलेली आहेत. 'जगा व जगू द्या, नांदा व नांदूं द्या' इतके व्यापक हिंदुसंस्कृतीचे स्वरूप आहे. त्यांत प्राचीन काळी आर्य, अनार्य, द्रविड, शक असे भिन्न वंश सामावले; बौद्ध, जैन, लिंगायत, नास्तिक हे धर्म सामावले, शैव व वैष्णवादि पंथ सामावले. अशा व्यापक अधिष्ठानावर उभारलेल्या संस्कृतीच्या चौकटीत बव्हंशी आमच्याच हाडामासाच्या व रक्ताच्या मुसलमानांना आपला धर्म संभाळूनही बसतां येणार नाही व त्यांनी आपल्या स्वतःच्या संस्कृतीसाठी अरबस्थानाकडे पाहिले पाहिजे, असे मुळीच नाही; पण त्यांनी तिकडे नजर देऊन हिंदुस्थानचे तुकडे करण्याचे मनांत आणले तर 'हिंदुस्थानच्या हिंदु सम्राटां'ची स्फूर्ति आसेतुहिमाचल हिंदुस्थानचे एकसंधी संरक्षण करण्यास जागती उभी आहे, हे सहज पाहणारांच्याही लक्ष्यांत आणून दिले पाहिजे.

 प्रस्तावनारूप प्रबन्ध म्हणतां म्हणतां बराच वाढला; पण मोठेपणाचा आव आणून लेखकाचे गुणदोष सांगणे किंवा समतोल विधाने करीत करीत त्यांचे अभिनन्दन करणे ही मला न साधण्याजोगी कामें बाजूस सारून या प्रस्तावनेचे निमित्ताने 'हिंदु सम्राटांचे आवाहन' ही मध्यवर्ती कल्पना या पुस्तकाचा आत्मा चर्चेस घेऊन त्यावर माझे विचार मी मांडले आहेत. मला लेखकांनी ही संधि देऊन, माझा गौरव केल्याबद्दल मी आभारी आहे.

पुणे, कार्तिक व० ५, शके १८६१
रा० वि० ओतुरकर.  
 

 ता. १-१२-३९