पान:हिंन्दू सम्राट्.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९२)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्


काचेचा असावा, असा भास व्हावयाचा ! ज्या दगडी स्तंभाला (दिल्ली) फेरोजशाह तघलघाचा स्तंभ ( लाट ) असे म्हटले जाते, तो अशोकाच्या वेळीं झालेला 'तोपरा' येथील स्तंभ होय ! त्याजवरील पॉलिश व चमक पाहून तो धातूचाच असावा, असे कित्येक पाश्चात्य लोकांनाही प्रथमतः वाटले. कृष्णराज राष्ट्रकूटाने बांधलेले प्रचंड शिवालय ( वेरूळचें लेणं ) हें जगांतील एक आश्चर्यच मानले जातें ! दक्षिणेत विजयनगर, तंजावर, मदुरा इत्यादि ठिकाणचीं भव्य मंदिरें व गोपुरें फारच प्रेक्षणीय आहेत. ह्या अनेक शिल्पकृतींमध्ये विविधता व वैशिट्यदेखील दिसून येतें. ओरिसांतील भुवनेश्वर मंदिर व आठनऊशे वर्षांपूर्वीचा जगन्नाथाचा पूल, दक्षिणेतील उंचच उंच व निमुळतीं गोपुरें, महाराष्ट्रांतील दौलताबाद किल्ला व हेमाडपंती घरें, कार्ले नाशिक इत्यादि ठिकाणचीं कोरीव लेणीं, अबूच्या पहाडावरील जैन मंदिरें, मेवाडमधील कुंभलगड किल्ला व राणा कुंभाचा कीर्तिस्तंभ इत्यादि भिन्न भिन्न प्रदेशांतील विविध कामें ह्रीं त्या कलेमधील विविधतेची व वैशिष्ट्याची उदाहरणें होत. प्रत्यक्ष बांधकामांप्रमाणे तीं कामें कशीं करावीं, ह्याविषयी हिंदु कारागिरांनी अनेक ग्रंथही लिहिले आहेत.

 उदाहरणार्थं राणाकुंभाच्या आश्रयाखालील ' सूत्रधारमंडन'कृत ‘ देवता मूर्तिप्रकरण व वास्तुशास्त्र, तसेच त्याचा पुत्र 'गोविंद' याचा ‘ कलानिधि ' व ' वास्तुमंजरी' इत्यादिकांवरून रजपुत कला कळून येते. दिल्लीमधील विख्यात लोहस्तंभ ' चन्द्रगुप्त' ( विक्रमादित्य ) ह्याच्या वेळचा आहे. पंधराशे वर्षे तो उभा व उघडा असून गंजलेला नाही व त्यावरील लेखही अद्याप जशाच्या तसा आहे ! त्याचा व्यास १६ इंच असून उंची सुमारें पंचवीस फूट आहे. अशा प्रकारचें भव्य ओतकाम आजच्या यांत्रिक युगांतही क्वचितच सापडेल ! डॉ० फर्ग्युसन ह्यानेही हिंदूंच्या ह्या प्राचीन कारागिरीची मुक्त कंठाने स्तुति केली आहे.