पान:हिंन्दू सम्राट्.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(८४)

हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्

मराठे व ब्राह्मण वगैरे महाराष्ट्रीय लोक मुसलमान सुलतानांकडे शिपाई, कारकून, सरदार किंवा प्रधान म्हणून नौकरी करून राज्यकारभाराचें शिक्षण अप्रत्यक्ष घेत होते. पूर्वी ज्याप्रमाणे हिंदु राजांच्या अंतःकलहाचा फायदा मुसलमानांस मिळाला होता, त्याचप्रमाणे आता मुसलमान राजांच्या भांडणामध्ये हिंदु सरदारही नोकर म्हणून ओढले गेल्यामुळे स्वपर बलाबलाची त्यांना कल्पना येऊन त्यांचे मनांत थोडा आत्म- विश्वास व स्वातंत्र्याची नैसर्गिक लालसा उत्पन्न होणें सहाजिकच होतें.

 श्रीरघुनाथपंत हणमंते, मोरोपंत पिंगळे, मादण्णा ह्यांच्यासारखे राज. कारणी पुरुष ज्या वाटाघाटी करीत होते, किंवा कर्नाटकांतून महाराष्ट्राच्या रोखाने जी धावपळ करीत होते, तिच्या मुळाशीं कांहीतरी उच्च ध्येय असले पाहिजे. अशा प्रकारच्या अपूर्ण आणि विस्कळीत हालचालींना पूर्णता देऊन च एकत्रित करूनच त्या वेळीं शिवाजीसारख्या चतुर व महत्त्वाकांक्षी पुरुषाने महाराष्ट्रांत, नव्हे दक्षिण देशांत स्वतंत्र हिंदु राज्याची स्थापना केली, हे उघड आहे.

 देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो शूर रजपुतांनी आत्मबलिदान करून- ही रणदेवता त्यांचेवर कां प्रसन्न झाली नाही? देवगिरीचे राजे 'यादव' अल्लाउद्दीनाच्या एका साधारण तडाख्यानेच कसे कोलमडून पडले? किंवा बंगालचे 'सेन' राजे मुसलमानांचा यत्किंचितही प्रतिकार का करूं शकले नाहीत? इत्यादि प्रश्न आपल्या इतिहासांत महत्त्वाचे आणि चिंतनीय आहेत. त्यांविषयी शिवाजीने सूक्ष्म विचार केला होता किंवा काय कोण जाणे ! परंतु अनेक हिंदु राजांच्या हातून झालेल्या चुकांची पुनरावृत्ति शिवाजीच्या राजवटींत दिसत नाही, एवढे मात्र खरें. शिवाजीच्या उद्योगांतील एकंदर धोरणाचा आता क्रमाने विचार करूं.-

 (अ) महाराष्ट्राचें अभेद्य संघटन हा शिवाजीच्या यशोमंदिराचा पाया होय ! हा पाया घालतांना त्याने सामदामादि सर्व उपाय योजिले.