पान:हिंन्दू सम्राट्.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(९)

 सम्राटांचा आम्हांस विसर पडला, असे मानणाऱ्यांच्या अधीर वृत्तीची कीव करावी तेवढी थोडी आहे, किंवा तेवढ्याने सार्वराष्ट्रीय राजकारण बिघडले, असे मानणेही चुकीचे आहे. लढाईचा उद्देश एकच असला, तरी तीत लढणाच्या शिपायांचे शौर्य निरनिराळ्या कारणांनी जागृत होते. कोणास आपला भाऊ मृत्यु पावला म्हणून चेव येतो, कोणी असहाय स्त्रीपुरुष मृत्युमुखी पडले म्हणून सूड घेण्यास प्रवृत्त होतात, कोणास सेनापतीच्या रक्षणासाठी देहाचे बलिदान करावेसे वाटते, कोणास रेड क्रॉसवर बाँब पडल्याबद्दल राग येतो, त्याचप्रमाणे स्थूल राष्ट्रीय भावना जागृत करण्यास एकेकाची मर्मस्थाने डिवचावी लागतात. धर्म हे एक हिंदुसमाजाचे डिवचण्याजोगें मर्मस्थान आहे, म्हणून हिंदु सम्राटांना आवाहन करणे, हे योग्य आहे.

 खेरीज हिंदुस्थानांत राहणाऱ्या काही अहिंदूची मनोवृत्ति नजरेआड करून कस चालेल ? हिंदुस्थान हें एक राष्ट्रच नाही, हिंदुस्थानात लोकशाही झाल्यास बहुसंख्य हिंदू मताधिक्य होणार, हे जाणून हिंदुस्थानास लोकशाही राज्यघटना जुळणारी नाही, अशी ओरड करण्यापर्यंत अल्पसंख्याकांची मजल गेलेली आहे ! अशा स्थितीत हिंदुस्थान हे एकसंधी राष्ट्र टिकवून धरण्याची जबाबदारी कोणावर आहे, याचा ज्याचा त्याने विचार करावा. मुसलमान या देशांत परके आहेत, असें मी तरी कालत्रयीं म्हणणार नाही. इस्लामधर्मियांच्या सहवासाने हिंदुस्थानावर जसे काही अनिष्ट परिणाम झाले असतील, तसे इष्ट परिणामहि झाले आहेत, हे मी 'हिंदुस्थानांतील मुसलमानांचं साम्राज्य' या पुस्तकांत दाखविले आहे. हिंदुस्थानांतील बहुसंख्य मुसलमान हिंदूंच्या हाडामासाचे व रक्ताचे आहेत. कित्येक तर हिंदु देवतांची पूजाही करतात. एकट्या विजापूर जिल्ह्यांत मुसलमानांतील ३८ पंथांपैकी १५ पंथ किंवा धंदेवाईक हिंदु देवतांची पूजा करतात. त्यांची नांवें-बागवान, बकरकसाब, पिंजारी, पेंढर, कंजर, आतार, मण्यार, मुकेरी, छपरबंद, भडभुंजे, गवंडी,