पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १०३ ) टवून टाकण्याचा काही तरी सौम्य उपाय लौकर योजावा अशी प्रार्थना आहे. पर्जन्यकाळी चार महिने मुंबईचे गव्हर्नरसाहेब व सेनापतिसाहेब पुण्यास असतात, त्याचप्रमाणे कौन्सिलदार, सेक्रेटरी, कमिशनर, कलेक्टर, त्यांचे असिस्टंट, व पोलीस सुपरिटेंडेंट इत्यादि सर्व अधिकारी पुण्यांत असतां लोकांमध्ये दंगे व्हावे हे फार आश्चर्यकारक आहे. पुण्यांत इतके अधिकारी व कायमची लष्करी मोठी छावणी बसलेली असून एकवेळच नव्हे, पण लागोपाठ तीन वेळ भरदिवसा पुणे शहरांत दंगे झाले, हे सरकारी अधिकाऱ्यांस लांछनास्पद नव्हे का? इंग्रज सरकारच्या राज्यांतील मोठाल्या अधिकाऱ्यांस राज्यकारभार चांगला करता येत नाही, असें ह्मणण्याचे साहस न करितां, सामोपचारांनी बोध करून युक्तीने शांतता करण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही किंवा इच्छा नाही असे ह्मणणे भाग पडते. नागव्या तरवारीने हवा त्याजवर पाहिजे तेव्हां वार करणे सोपे आहे, पण तसले रक्तस्रावांचे प्रसंग युक्तीने टाळून अगदी बंद करणे हे फार कठीण व खऱ्या शहाणपणाचे काम आहे. ते वेळेवर जो करील त्यालाच दयाळू, मुत्सदी, व जनहितकर्ता असे सर्व लोक ह्मणतात. यास्तव तसलें सुयश मिळविण्याचा सरकाराने व सरकारी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशी विनयपूर्वक प्रार्थना आहे. प्रजेमध्ये परस्परांत तंटे होऊन हातघाईवर मजल जाण्याचा रंग दिसल्यास तसे न होऊ देण्याचे उपाय करावे अशी राजनीति आहे. साम, दान, दंड आणि भेद असे प्रकार प्रसिद्धच आहेत. तंटे करण्यास जे दोन पक्ष उभे राहतात