पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३७ )

फायद्यावांचून एखादी पै खर्च झाली तरी देखील ते भागीदार कुरकूर करीत. शिवाय कंपनीचे नौकर गरीब असत; त्यांचा पगारहि होईल तितका कमी करण्यांत येत असे; व ह्यामुळे आपली प्राप्ति वाढविण्यास लांच घेणें, किंवा स्वतःच्या नांवावर व्यापार करणें ह्यांतील कोणता तरी मार्ग त्यांस स्वीकारावा लागे. 66 मुला, पैसा मिळव, साधल्यास प्रामाणिकपणाने मिळव, परंतु पैसा मिळविल्यावांचून राहूं नको, " अशा प्रकारचा उपदेश बापाने मुलास केला असतां जो परिणाम होणार - तसाच परिणाम वरील स्थितीचा झाला; व ह्याच तत्वास अनुसरून बंगालचा राज्यकारभार होऊं लागला.
  ह्याचा परिणाम स्वाभाविकपणेच पुढे लिहिल्या- प्रमाणे झाला.. ह्या कंपनीच्या जुलमी अमलाखालीं गरीब नेटिव्ह धुळीस मिळाले. नेटिव्ह राजांच्या अमलांत त्यांची जी स्थिति होती, तीहून वाईट स्थिति त्यांची कंपनीच्या अमलांत झाली. नेटिव्ह राजांनी आपल्या नियमित अधिकाराचे उल्लंघन केलें तर कंपनी त्यांस पदच्युत करी; परंतु कंपनीपासून आपली सुटका करून घेणें नेटिव्हांस अशक्यच होतें, ह्याचा परिणाम असा झाला की, वारं- वार दुष्काळ पडूं लागले, आणि भुकेनें व रोगानें इतके लोक मेले की, त्यांच्या प्रेतांनी गंगा नदी भरून गेली. ह्या भयंकर स्थितीची हकीगत हळू हळू इंग्लंदांत गेलीच, व ती ऐकून इंग्लिश लोकांचें अंतःकरण जागृत झालें.