पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २२ )

ते ख्रिस्ती लोकांना जितकें पाण्यांत पाहतात तितकेंच हिंदूंनाहि पाण्यांत पाहत असत. स्वधर्मप्रसाराच्या वेडानें अफगाण लोकांस उत्तेजन आलें होतें; व हिंदुस्थानावर स्वारी केल्याने आपणास पुष्कळ लूट मिळेल, असाही मोह त्यांस उत्पन्न झाला होता. म्हणून गिझनीच्या महंमुदास पुढारी करून ते झपाट्यानें हिंदु लेोकांवर सरसावून आले. हिंदूंचें व अफगाणांचें युद्ध मोठ्या निकराचें झालें, परंतु अखेरीस अफगाणांस जय मिळाला, व त्यांनीं हळूहळू हिंदुस्थानांत मुसलमानी राज्यें स्थापिली; आणि बहुतेक ठिकाणी त्यांनीं हिंदूंस दास्यत्वाच्या स्थितीस नेऊन पोहोंचविलें. ही दुस-या स्वारीची हकीगत झाली.
मोगल लोकांची स्वारी
 परंतु अफगाण लोकांच्या हातीं फार काळपर्यंत शांततेनें सत्ता राहिली नाहीं. इंग्लंदांत ८ वा हेन्री राजा राज्य करीत होता त्या सुमारास(इ. स. १५०० च्या सुमारास) मध्य एशियांतून मुसलमान लोकांची एक नवी टोळी हिमालय पर्वतांतून हिंदुस्थानाकड़े शिरकाव करूं लागली, व हिनें अफगाण लोकांच्या फौजेच्या पिछाडीवर हल्ला केला. हे नवीन आलेले लोक मोगल होत. ह्यांच्या पूर्वी आलेल्या अफगाण लोकांपेक्षां हे जास्त बळकट होते; व कालेंकरून त्यांनीं अफगाण लोकांस जिंकिलें; आणि दिल्ली शहर बळकावून त्या ठिकाणीं आपल्या पुढा-यास "मोठा मोगल" (ग्रेट मोगल) ही संज्ञा देऊन त्याची स्थापना केली.