पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )

व त्यामुळे सर्व देश, लोक भाषा व धर्म ह्यांची निरनिराळ्या भागांत कमजास्त प्रमाणानें अशी कांहीं गुंतागुंत झाली कीं, ती सोडवितां म्हणून यावयाचीच नाही; असा प्रकार घडला असतां युरोप खंडाची जी स्थिति होईल तिची कल्पना करा, आणि तशीच सांप्रत हिंदुस्थानची स्थिति आहे, असें समजा. हिंदु, मुसलमान, बुद्ध, शिख, ख्रिस्ती, पारशी वगैरे भिन्न जातींचे व धर्मांचे लोक ह्या देशांत एकमेकांशेजारीं राहत आहेत. तसेंच सर्वे युरोपखंडांत जितक्या प्रकारच्या भाषा चालतात त्यांहून अधिक प्रकारच्या भाषा हिंदुस्थानांतील एकाच रस्त्यानें जाणारे येणारे लोक बोलतात, असे दिसून येईल. फ्रेंच व जर्मन ह्या लोकांत जसा अत्यन्त द्वेष आहे, तसा जातिद्वेष हिंदुस्थानांतील भिन्न भिन्न जातींच्या लोकांत आहे; व त्या लोकांच्या हरहमेष गांठी पडत आहेत. हिंदुस्थानांतील रहिवाशांमध्यें अति मोठी संख्या *हिंदूंची; पण त्यांच्यांत देखील अनेक जातिभेद आहेत; व ह्या जातिभेदांमुळे कित्येक धंदे पिढीजाद होऊन बसले आहेत. ह्या निरनिराळ्या जातीं
________________________________________________________________________________

*सन १८९१ तील खानेसुमारीप्रमाणें हिंदुस्थानची एकंदर लोकसंख्या सुमारें साडे २८ कोटेि असून मुख्य जातींची पुढे लिहिल्याप्रमाणें आहे:- हिंदु पावणे एकवीस कोटेि; मुसलमान पावणे सहा कोटि; बुद्ध ७० लक्ष; शिख १९ लक्ष; जैन १४ लक्ष; पारशी ८९ हजार; इस्रायल १७ हजार; आणि ख्रिश्चन पावणे तेवीस लक्ष.