पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७८) मध्ये सरकारची "रेव्हेन्युपद्धत" हे या दंग्याचे एक कारण आहे, असा बहुमताने ठराव झाला. या संबंधांत मिस्तरआतां सर-आकलंड कोल्व्हिन व मि. कार्पेटर यांचे ठराव वाचण्यासारखे आहेत. - कांहीं सरकारी कामदारांस वाटते की, सावकार हे शेतकरी लोकांच्या कर्जबाजारीपणास कारण आहेत. परंतु हे खोटें आहे. सावकार कांहीं कुणब्याकडे तूं माझें कर्ज घे ह्मणून ह्मणण्यास जात नाही, आणि यदाकदाचित् कोणी गेलाच, तरी जरूर नसतां सवाईचे किंवा कित्येक प्रसंगी दिढीचें व्याज कबूल करून त्याचे पैसे व्याजी घेण्याइतके कांहीं आमचे कुणबी मूर्ख नाहीत. ' ज्याचे पोटांत दुखेल तोच औषध मागेल,' या न्यायाने ज्याला खायला नसेल किंवा ज्यांच्यापाशीं सरकारी धारा भरावयाला पैसा नसेल, तोच सावकाराची पायरी चढून आपल्या गरजेप्रमाणे कमीजास्त व्याज कबूल करून रक्कम घेईल. नोटीसफी, जप्तीखर्च आणि धाऱ्याच्या चौथाई दंड भरावयास पडूं नये, वाडवडिलांपासून कित्येक पिढ्या ज्या जमीनीच्या तुकड्यावर पोट भरलें, तो तुकडा बाहेर लोकांच्या घरांत जाऊ नये, वसूल न दिला तर खालच्या दर्जाच्या सरकारी नोकरांकडून ज्या ज्या विटंबना होतात, जी अपमानाची बोलणी सोसावीं लागतात आणि जो आईमाईचा उद्धार होतो तो होऊ नये, असे ज्यांस वाटते तेच जवळ पैसा नसल्यामुळे सावकाराचे तोंड पाहतात.