Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास प्लेगचा आरंभ [ केसरी, लेख ता. ६-१०-१८९६ ] हल्ली जी मुंबईस भयंकर तापाची सांथ चालू आहे तिच्या संबंधाने वाचकांस कांहीं माहिती देण्याचा आमचा विचार आहे. मांडवी हा मुंबई शहराचा एक फार दाट वस्तीचा व बराच गलिच्छ भाग आहे. तेथील लोकवस्ती सुमारे ३७,००० आहे. तेथे धान्याच्या मोठाल्या वखारी आहेत व गुजराथी, वाणी व भाटे लोकांची वस्ती फार आहे. सात मजली मोठ्या हवेल्या बहुतेक मालांनी भरलेल्या व ज्यांत हजार हजार लोक राहतात अशा मोठाल्या चाळीहि तेथे ब-याच आहेत. वाणी व भाटे यांच्याशिवाय वोहरी, खोजे व इतर मुसलमान लोक, देशावरील व कोंकणातील मराठे, कुणबी वगैरे लोकांचीहि तेथे बरीच वस्ती आहे. हा भाग बहुतेक मुंबई बेटाच्या पूर्वदिशेकडील असल्यामुळे पश्चिमेकडून वाहणा-या समुद्र वायूचा याला फारसा फायदा मिळत नाही. कारण या शहराच्या पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र व हा भाग यांच्या दरम्यान शहराचा बराच भाग डोंगराप्रमाणे आडवा पडून राहिला आहे. या भागांतील गटारे जुन्या चालीची असल्यामुळे त्यांतून मैलापाणी खळखळा वाहून जात नाहीं. बराच दाट मैला गाळाच्या रूपाने तळाला सांचून राहतो. म्हणून या प्रदेशात फिरणाराला गटाराची दुर्गंधी बरीच अनुभवास येते. दाट वस्तीच्या मुंबई शहराचा अति दाट भाग, गलिच्छ लोकांची वस्ती, समुद्रवायु यथेच्छ न मिळण, गटाराची वाईट स्थिति इत्यादि अनेक कारणे लक्षांत आणली म्हणजे, हल्लींची सांथ प्रथम मांडवी येथेच कां सुरू झाली हे कळून येईल. शिवाय परदेशांतून व्यापारासंबंधाने व्यापारी गलबते लागण्याची जागाहिं हया प्रदेशापासून जवळच असल्यामुळे लांब लांब देशांतील संसर्गजन्य विकाराचा संपर्कहि प्रथम हयाच प्रदेशांतील लोकांस घडणे साहजिकच आहे; हल्लींची सांथ मुंबईस बाहेरून म्हणजे हांगकांग किंवा बगदादकडून आला असावी असे कित्येकांचे मत आहे. हल्लीं जो मुंबईस ताप सुरू आहे त्याला