पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
८७
 

वैश्या यांपासून झाली (औशनस) व शुद्र आणि क्षत्रिया यांपासून झाली (अग्निपुराण) अशी भिन्न मते आहेत. उग्र ही जात क्षत्रिय-शूद्रा, क्षत्रिय-वैश्या, वैश्य-शूद्रा अशा संकरांतून जन्माला आली असे मनू, वसिष्ठ व सूत-संहिता यांचे अनुक्रमे मत आहे. निषाद, पुक्कस, मागध, वैदेहक, कैवर्त यांच्याबद्दल अशीच भिन्न मते आहेत. (अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ- श्रीधरशास्त्री पाठक, पृ. १६६–१७६) ही मतभिन्नता पाहिली म्हणजे, त्या त्या जातीवर शिक्के मारताना, या शास्त्रकारांच्या मनात कोणताही युक्तिवाद नव्हता, केवळ त्यांच्या लहरीवर हे चालले होते, याबद्दल शंका राहात नाही.
 या शास्त्रकारांची स्तुती करताना त्यांनी सर्व वर्णाना व जातींना योग्य ते व्यवसाय लावून दिले, हे त्यांचे बुद्धिकौशल्य म्हणून सांगण्यात येते. पण प्रत्यक्षात पाहाता त्यांनी कोठे बुद्धी वापरली असेल अशी शंकासुद्धा येत नाही. अंबष्ठ ही जात पाहा. हिच्या उत्पत्तीविषयी मतभेद आहेत हे वर सांगितलेच आहे. तसेच तिच्या व्यवसायाविषयीही आहेत. मनूने या जातीला वैद्यक हा व्यवसाय- 'लावून दिला' आहे. तर उशनाने तिला शेती, अ-नर्तन(?) किंवा ध्वज रक्षण हे धंदे सांगितले आहेत. आयोगव जातीला सुतारी हा धंदा मनूने सांगितला आहे. तर उशनाने तिला कोष्ट्याचा, शेतकऱ्याचा, तांबटाचा किंवा कापडाच्या व्यापाराचा धंदा लावून दिला आहे. एकच माणूस सुतारी, कापड- व्यापार, शेती या व्यवसायांना योग्य ठरतो याचा अर्थ काय ? या व्यवसायांना सारखेच गुण लागतात की काय ? आणि अमक्या वर्णाचा संकर झाला म्हणजे त्यातून जन्मलेल्या संततीच्या ठायी अमक्या व्यवसायाला योग्य असे गुण उपजतच येतात असे या शास्त्रकारांनी कशावरून ठरविले ? उग्र या जातीने घुशी, उंदीर पकडून उपजीविका करावी असे मनू म्हणतो तर उशना म्हणतो की तिने भालदार-चोपदार व्हावे किंवा गुन्हेगारांच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी. या सर्व उद्योगांना एकाच प्रकारचे कौशल्य लागते, असे या शास्त्रकारांचे मत असले तर तो मोठा विनोदच आहे. मूर्धावसिक्त ही ब्राह्मण व क्षत्रिया यांपासून झालेली जात. तिला राजपद मिळाले तर तिने राज्य करावे, नाही तर आयुर्वेद, ज्योतिष किंवा मंत्रविद्या यांवर उपजीविका करावी, अशे शास्त्रकार सांगतात. राज्यकारभार आणि आयुर्वेद यांना सारखेच गुण लागतात असे समजणाऱ्या शास्त्रकारांचे बुद्धि-