पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

कौशल्य काय वर्णावे ! (शास्त्रकारांच्या वरील मतासाठी— काणे धर्मशास्त्र, खंड २ रा, पृ. ७१ ते ९१ पाहा) या सर्वांवरून हे स्पष्ट दिसते की जातींच्या कपाळावर शिक्के मारताना शास्त्रकारांनी ज्याप्रमाणे केवळ स्वतःच्या लहरीने निर्णय केले, त्याचप्रमाणे त्यांना व्यवसाय लावून देतानाही स्वतःची लहर हाच त्यांचा युक्तिवाद होता. आणि अशा या फुसक्या युक्तिवादाच्या आधारे शास्त्रकारांनी बहुसंख्य हिंदूंना शूद्रांना धर्मबाह्य ठरवावे, अज्ञानाच्या नरकात त्यांना कायमचे पिचत ठेवावे आणि हिंदूंतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी या शास्त्रकारांच्या वचनाला मान देऊन त्यांना शतकानुशतक दुर्गति पंकात लोटून द्यावे यापेक्षा दुसरा आत्मघातकीपणा कोणता ?

हिंदुची सहिष्णुता
 शूद्राला या शास्त्रकारांनी धर्मबाह्य ठरविले आहे. त्याला वेदाधिकार नाही. त्याच्यादेखत इतरांनीसुद्धा वेद म्हणू नयेत, तो पशूसारखाच होय, शूद्र म्हणजे श्मशानच होय, अशी मते त्यांनी मांडली आहेत. त्यांचे धंदे ओंगळ होते म्हणून त्यांना असे हीन लेखीत, असे शास्त्रकारांनी म्हटले आहे. पण यात काही अर्थ नाही. काही जातीचे धंदे ओंगळ असतील; पण शेतकरी, माळी, सुतार, लोहार यांचे धंदे तर ओंगळ नव्हते ना ? मग त्यांना शूद्र लेखून त्यांना वेदपठण वर्ज्य का केले ? हिंदुधर्मीय लोक अत्यंत सहिष्णू अशी जगात कीर्ती आहे. ख्रिस्ती, मुसलमान यांचा असा सिद्धान्त आहे की, येशू किंवा अल्ला यांना शरण गेलात तरच तुमचा उद्धार होईल. पण हिंदूंना तसे वाटत नाही. प्रत्येकाने आपापल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही देवतेची उपासना करावी, कोणताही धर्ममार्ग अनुसरावा व आपला उद्धार करून घ्यावा, अशी हिंदूंची उदारवृत्ती आहे. यामुळेच सातवाहन, गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट इ. प्राचीन राजे स्वतः वैदिक धर्माचे अनुयायी होते तरी, त्यांनी बौद्ध, जैन यांना हिंदुधर्मियां- प्रमाणेच वागविले, त्यांच्या विहारांना, मठांना दाने दिली, जमिनी दिल्या, त्यांना धर्मस्वातंत्र्य दिले. हिंदू असे सहिष्णू आहेत हे खरेच आहे. पण ही सहिष्णुता ते परमधर्मियांना दाखवितात ! हिंदूंना नाही. तसे नसते तर त्यांनी शूद्रांना यज्ञधर्माचा अवलंब करण्याची, वेदपठनाची मनाई का केली असती ? ख्रिस्ती, मुस्लीम यांना आपापल्या श्रद्धेप्रमाणे बायबल- कुराणांचा