पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

भागवत या पुराणांचे कर्ते व रघुनंदन, कमलाकर व नागेश भट्ट हे सोवळे ब्राह्मण यांसकट सर्व ब्राह्मण शास्त्रान्वयेच शूद्र ठरतात. ज्या शास्त्रान्वये क्षत्रिय शूद्र ठरतात त्याच शास्त्राअन्वये ब्राह्मणही शूद्र ठरतात. आणि शिवाय सर्व स्त्रिया शूद्र ठरल्यामुळे मातृसावर्ण्याच्या नियमाप्रमाणे सर्व वर्णांच्या स्त्रियांची संतती, अर्थात ब्राह्मणही शुद्रच ठरतात !

लहरी शास्त्र :
 हे शास्त्रकार अर्थातच ब्राह्मणांना शूद्र मानावयास तयार होणार नाहीत. कारण ब्राह्मण हा अत्यंत हीन असला तरी तो पूज्य होय, असे त्यांचे मत आहे. क्षत्रिय हे सर्व शूद्र होत हे मत कोणत्याच स्मृतीला मान्य नाही. दहाव्या शतकाअखेरपर्यंतचे सर्व स्मृतींचे टीकाकारही, क्षत्रियांचे धर्म काय, ते विवरून सांगतात. तेव्हा कलियुगात क्षत्रियच नाहीत, हे मत त्यांना मान्य होते, असे दिसत नाही. (काणे- धर्मशास्त्र, खंड २ रा, पृ. ३८१) तरी बाकी राहिलेली यादी काही लहान नाही. जवळजवळ सर्व बहुजन समाज त्यात समाविष्ट होतो. त्यामुळे मनात असा प्रश्न येतो की, या सर्वांना शास्त्रकारांनी शूद्र का ठरविले ? काही अमंगळ उद्योग, पापकर्म, अभक्ष्यभक्षण, वेदत्याग, ही कारणे दिलेली आहेत. (शांतिपर्व १८९- १) आपापल्या कर्माने अनेक लोक शूद्र होतात असे वेदव्यास- स्मृतीत म्हटले आहे. वर्णसंकरामुळे संतती शूद्र होते असे तर अनेक शास्त्रकार सांगतात. पण शास्त्रकारांच्या निरनिराळ्या सर्व उपपत्ती पाहिल्यावर तर्कशुद्ध- प्रतीतिकारक असे कोणतेच कारण त्यांतून दिसत नाही. केवळ शास्त्रकारांची लहर एवढेच एक कारण दिसते. त्यांच्या हातात शिक्के होते ते त्यांनी आपल्या लहरीप्रमाणे वाटेल त्याच्या कपाळी उठविले व त्यांच्या जाती ठरविल्या. हे मत म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे, अर्धसत्य आहे, असे म. म. काणे म्हणतात (धर्मशास्त्र, खंड २ राः प्रकरण २ रे; पृ. ५१). पण त्यांनीच त्या प्रकरणात जी माहिती दिली आहे तीवरून, तेच संपूर्ण सत्य आहे, असे दिसून येईल.
 भिन्न वर्णांच्या संकरापासून झालेल्या संततीच्या, शास्त्रकारांनी, ज्या जाती ठरविल्या आहेत त्या पाहा. अंबष्ठ ही जात ब्राह्मण आणि वैश्या (वैश्य स्त्री) यांच्या संकरापासून झाली, असे मनुस्मृतीचे मत आहे, तर ती ब्राहाण आणि क्षत्रिया यांपासून झाली, असे वसिष्ठस्मृती म्हणते. आयोगव ही जात शूद्र व