पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
८५
 

वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजम् ।' असे शास्त्र असताना यांना शूद्र का गणले हे सांगणे कठीण आहे. खरा चमत्कार पुढेच आहे. इ. स. पूर्व ४ थ्या शतकानंतर भारतात क्षत्रियवर्णच नाही, राजसत्ता चालविणारे सर्व लोक शूद्रच आहेत, असा एक सिद्धांत शास्त्रकारांनी मांडून ठेवलेला आहे. महानंदी हा शैशुनाग वंशातला त्या काळचा राजा. महापद्मनंद हा त्याला एका शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा. पुराणे असे सांगतात की, त्याने सत्तारूढ झाल्यावर, सर्व क्षत्रियांचा, परशुरामाप्रमाणेच संहार केला. आणि तेव्हापासून भारतात क्षत्रियच नाही. जे राजे आहेत ते, आपणांस क्षत्रिय म्हणवीत असले तरी, वास्तविक शूद्रच होत. विष्णुपुराण, मत्स्यपुराण व भागवतपुराण यांत हा सिद्धान्त मांडलेला आहे. आणि त्याच्या आधारे रघुनंदन (१६ वे शतक) याने आपल्या 'शुद्धितत्त्व' या ग्रंथात, कमलाकर भट्ट (१७ वे शतक) याने 'शुद्रकमलाकरात' व नागेश भट्ट (१८ वे शतक) याने 'व्रात्यताप्रायश्चितनिर्णय' या ग्रंथात 'कलियुगात ब्राहाण व शूद्र हे दोनच वर्ण आहेत 'कलावद्यंतयोः स्थितिः' असा निर्णय दिलेला आहे. (काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, पृ. ३८०-८१)
 कारुनारू हे शूद्र आहेतच; वणिक व कृषीवल यांना शास्त्रकारांनी शुद्र ठरविले आहे. 'नंदान्तं क्षत्रियकुलम्' या वचनान्वये सर्व क्षत्रिय शूद्र झाले. यानंतर शास्त्रकारांची दृष्टी स्त्रियांकडे वळली. व त्यांनाही त्यांनी शुद्र ठरवून जन्माचे सार्थक करून घेतले. पूर्वी स्त्रियांना वेदपठनाचा अधिकार होता. पुढे तो नाकारण्यात आला. म्हणून मग त्या शूद्र ठरल्या. 'स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः' असा गीतेने स्त्रियांचा शूद्रांबरोबर केलेला उल्लेख प्रसिद्धच आहे. पण स्त्रिया, शूद्र, कुत्रे- असाही एकत्र उल्लेख अनेक शास्त्रकार करतात. (काणे, वरील ग्रंथ, पृ. ५७६ ते ५७८)
 आता राहिले फक्त ब्राह्मण. शास्त्रकारांनी त्यांना शूद्र ठरविले नाही हे खरे. पण त्यांना शूद्र ठरवून टाकण्याची व्यवस्था मनूने करून टाकली आहे. मनूचे असे शास्त्र आहे की, ज्या देशात शूद्र राजा आहे त्या देशात ब्राह्मणांनी राहू नये (मनु ४.६१). अर्थात या आज्ञेचा अवमान करून ब्राह्मण शूद्र-राज्यात राहिले तर ते पतित होणार हे उघडच आहे. आता भारतात तर अडीच हजार वर्षे क्षत्रियच नाहीत. तरी ब्राह्मण येथे राहातच आहेत. तेव्हा विष्णू, मत्स्य व