पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

हे मागल्या लेखात दाखविलेच आहे. पुढे त्या धर्माचे रक्षण होईना. त्यामुळे सामाजिक न्याय ही कल्पनाच हिंदुसमाजातून नष्ट झाली. आणि या घोर पातकामुळे त्याचा नाश झाला.

सर्व समाज शूद्र
 जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्याचे म्हणजेच विषमतेचे पुरस्कर्ते जे शास्त्रकार त्यांनी ब्राह्मणांच्या भौतिक पिंडाला महत्त्व देऊन समाजाला कसे विकृत, अन्यायकारक व अधोगामी धर्मशास्त्र सांगितले ते आपण पाहिले. आता शूद्रांच्या बाबतीत तशाच जन्मजात उच्चनीचतेच्या तत्त्वाचा अवलंब करून वरच्यापेक्षाही शतपटीने आंधळे, मूढ आणि अविवेकी शास्त्र त्यांनी कसे रचले ते पाहावयाचे आहे.
 प्रथम शूद्र या वर्णात या शास्त्रकरांनी कोणाचा समावेश केला आहे ते पाहू. कारुकर्म करणारे, कारुनारू म्हणजे साधारणतः बलुतेदार व अलुतेदार हे सर्व (काही अपवाद वजा जाता) या वर्णात येतात. सुतार, लोहार, कुंभार, परीट, न्हावी, गुरव, कोळी, तेली, तांबोळी, साळी, माळी, ठाकर, घडशी, हे सर्व शास्त्रकारांच्या मते शूद्र होत. चांभार, महार, मांग, बुरुड यांचा समावेश अलुतेबलुतेदारांत होतो. तरी उत्तरकालीन स्मृतिकारांनी त्यांना अस्पृश्य ठरविले आहे. पूर्वी त्यांचा शुद्र वर्णातच समावेश होत असे. याशिवाय गुराखी, नट, रथकार, भिल्ल, यांनाही शूद्र मानलेले आहे. पण एवढ्यावर हे भागत नाही. मनुस्मृती, यमस्मृती, पराशरस्मृती, बृहत्पाराशर स्मृती, कूर्मपुराण, यांनी शेतकऱ्यांनाही शुद्र ठरविले आहे. आर्धिक, कृषीवल, अर्धसीरी, क्षेत्रकर्षक असा त्यांचा या ग्रंथांत निर्देश केलेला आहे. वेदव्यासस्मृतीमध्ये वणिक व कायस्थ यांचीही शुद्रांत गणना केलेली आहे. (स्पर्शास्पर्श विचार, पं. सातवळेकर, भाग ८ वा अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ, पाठक, पृ. ४५-४८) प्रतिलोम संकरापासून झालेली सर्व प्रजा प्राचीन काळापासून शास्त्रकारांनी शूद्र ठरविली आहे हे प्रसिद्धच आहे. अनुलोमविवाह दीर्घकाळपर्यंत शास्त्रविहित होते; तरी पुढे पुढे मातृसावर्ण्य रूढ झाले, संतती मातेच्या वर्णाची ठरू लागली. व त्यामुळे शूद्र स्त्रियांना द्विजांपासून झालेली संततीही शूद्र ठरू लागली.
 वरील यादीत वणिक आणि शेतकरी हे दोघेही आलेले आहेत. 'कृषिगोरक्ष्य-