पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
८३
 

काहींच्या मते केवळ श्रोत्रीय ब्राह्मण करमुक्त असावे. पण काहींच्या मते सर्वच ब्राह्मण ! कारण त्यांचे पुण्य राजाला मिळते तो करच होय ! प्रत्येक गुन्ह्यासाठी प्रत्येक वर्णाला शास्त्रकारांनी भिन्नभिन्न शिक्षा सांगितल्या आहेत. शूद्राने वरिष्ठ- वर्णीय स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याला लिंगच्छेदाची शिक्षा. पण ब्राह्मणाने ब्राह्मणस्त्रीवर बलात्कार केला तरी फक्त १००० दंड. शूद्राने ब्राह्मणाची निंदा केली तर त्याची जीभ कापावी, वैश्याने ब्राह्मणाची बदनामी केली तर १५० दंड, क्षत्रियाला १०० दंड. पण ब्राह्मणाने शूद्राची निंदा केली तर १२ दंड किंवा मुळीच दंड नाही.
 हा अन्याय आहे, पक्षपात आहे असे काही शास्त्रकारांना जाणवत होते. त्यामुळे त्यांनी हे केवळ श्रोत्रीय, विद्वान ब्राह्मणापुरतेच मर्यादित आहे, किंवा हे केवळ अर्थवादात्मक आहे, शास्त्रकारांच्या मनात तसे नाही, असे म्हणून या अन्यायाचे स्वरूप सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. काही शास्त्रकारांनी एक-दोन गुन्ह्यांच्या बाबतीत अगदी उलट धोरण सांगितले आहे. चोरीच्या गुन्ह्यांसाठी शूद्राला जितका दण्ड त्याच्या दुप्पट वैश्याला, त्याच्या दुप्पट क्षत्रियाला व त्याच्या दुप्पट ब्राह्मणाला दण्ड, गौतम आणि मनू यांनी सांगितला आहे. कारण गुन्ह्याचे खरे स्वरूप कळण्याची पात्रता त्याला असते, ती शूद्राला नसते. वास्तविक हीच दृष्टी सर्वत्र ठेवावयास हवी होती. तसा एक विचारप्रवाह होता, हे मागल्या लेखात सांगितलेच आहे. तशा निःपक्षपाती न्यायाच्या बळावरच अनेक शतके हा समाज टिकू शकला. पण या दुसऱ्या प्रवाहाचा जोर हळूहळू वाढत गेला. व समाज विघटित होऊ लागला असे म. म. काणे यांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. (धर्मशास्त्राचा इतिहास, खंड २ रा, पृ. १७१- १७९) हे विवेचन करताना काणे यांनी युरोपात धर्मगुरूंच्या बाबतीत यापेक्षाही भयंकर पक्षपात होत असे, असे अनेक प्रमाणांनी दाखवून दिले आहे. तेथे असा विषम न्याय होता यात शंकाच नाही. पण पाश्चात्त्य युरोपातील एकेक राष्ट्राने व तेथील जागरूक जनतेने याविरुद्ध लढा केला व ती विषमता नष्ट केली. आणि ज्यांनी समतेच्या धर्माची स्थापना केली त्याच राष्ट्रांचा उत्कर्ष झाला अशी इतिहासाची साक्ष आहे, हे आपण ध्यानात ठेविले पाहिजे. भारतात वरील विषम न्याय शास्त्रविहित होता तरी त्यावर मात करून समताधर्म इ. स. दहाव्या शतकापर्यंत विजयी होत होता,