पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

जडत्व आणले. जडाची उपासना केल्यावर दुसरे काय होणार ! तेच समाज- रचनाशास्त्रात झाले. चारित्र्य, तप, वेदाध्ययन, श्रद्धा, शौर्य, क्षात्रतेज, विजिगीषा यांचे म्हणजे चैतन्याचे महत्त्व जाऊन ब्राह्मण, क्षत्रिय यांच्या भौतिक पिंडाला मान मिळू लागला. या भौतिक पिंडात वरील थोर गुण सतत नियामाने राहात असते तर चातुर्वर्ण्यरचनेला कोणीच विरोध केला नसता. पण तसे ते राहत नाहीत, हे पूर्वीच्या शास्त्रकारांनीच लिहून ठेविले आहे. तरी या वर्णाना मान द्यावा असा त्यांचा आग्रह आहे. अर्वाचीन काळी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाल्यानंतरही राजवाडे, बाळशास्त्री हरदास यांसारखे पंडित चातुर्वर्ण्याचे समर्थन करतात हे मोठे दुर्दैव होय. जन्माने वर्ण ठरत असूनही, ब्राह्मणक्षत्रियांचा अनेक कालखंडात अधःपात झाला, असे याच पंडितांनी लिहिले आहे. तरी 'त्यागी, ज्ञानोपासक ब्राह्मणवर्ग निर्माण केला व तो सहस्रावधी वर्षे टिकवून दाखविला, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होय' असे त्यांचे मत आहेच.

सामाजिक न्यायाचा अभाव :
 ब्राह्मणांच्या भौतिक पिंडालाच महत्त्व दिल्यामुळे न्यायदानात पक्षपात करण्याची बुद्धी शास्त्रकारांना सहजच झाली. आणि त्यातून उद्भवणाऱ्या अन्यायाची, विषमतेची, अणुमात्र क्षिती न बाळगता शास्त्रकारांनी पक्षपाती शास्त्र, धर्म म्हणून लिहून ठेविले. राजा हा सर्व प्रजेचा शास्ता होय; पण ब्राह्मणांवर त्याची सत्ता चालणार नाही. ते शासनमुक्त आहेत. ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी त्याला फटक्याची शिक्षा द्यावयाची नाही, त्याला बेड्या घालावयाच्या नाहीत, त्याला हद्दपार करावयाचे नाही, त्याला दण्ड करावयाचा नाही, त्याची निर्भर्त्सनाही करावयाची नाही, असे गौतमधर्मसूत्राचे म्हणणे आहे. इतर शास्त्रकारांनी हे विधान फक्त विद्वान ब्राह्मणालाच लागू आहे, असे म्हटले आहे. पण कोणत्याही कारणाने ब्राह्मणाला देहदंड द्यावयाचा नाही, याविषयी कौटिल्याखेरीज सर्वांचे एकमत आहे. ब्राह्मणाने राजद्रोह केला, फितुरी केली तर त्याला नदीत बुडवावे, असे कौटिल्य सांगतो. इतरांनी घोर अपराधासाठी ब्राह्मणाचे मुंडन करून त्याच्या कपाळावर तप्त मुद्रा ठोकून त्याला हद्दपार करावे, असे म्हटले आहे. ब्राह्मणापासून कर घेऊ नये असे बहुतेक स्मृतींनी सांगितले आहे