पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
८१
 

'देवपूजेसाठी बोलाविताना ब्राह्मणाचे चारित्र्य वा त्याची विद्वत्ता पाहू नये,' (अनुशासन पर्व ९०.२) 'परीक्षा करूनच ब्राह्मण बोलवावा असे वेदवचन आहे हे खरे, पण परीक्षा न करणेच चांगले. परीक्षा न करता ब्राह्मण बोलाविले तर पितर व देव संतुष्ट होतात.' (अपरार्क- पृ. ४५५) ब्राह्मण सत्शील असो, दुःशील असो, सुसंस्कृत असो, हीन असो, त्याचा अपमान करू नये; कारण तो भस्माखालच्या अग्नीसारखा असतो.' (वृद्धगौतमस्मृती, अध्याय ३ रा) अशा तऱ्हेची विपुल वचने धर्मशास्त्रात सापडतात. (काणे, खंड २ रा, पृ. ११७, १३५, १३६) याचा अर्थ स्पष्ट आहे. चारित्र्य, तप, वेदाध्ययन, विद्वत्ता, ज्ञान, यांची किंमत या शास्त्रकारांच्या लेखी शून्य होय. असे शास्त्रकार जेथे झाले आणि अशांना जेथले लोक अनुसरले त्यांचे भवितव्य सांगण्यास श्रुतिस्मृतींची गरज नाही.

नरोटीचे महत्त्व :
 केवळ जातिब्राह्मणाला मान द्यावा ही जी प्रवृत्ती ती म्हणजे सर्व जीवनव्यापी अशा एका घातकी प्रवृत्तीचा एक भाग आहे. जडाला, भौतिक पिंडाला, बाह्य सांगाड्याला, नरोटीला महत्त्व द्यावे आणि आतील चैतन्याची उपेक्षा करावी, आत्म्याला गौण लेखावे, श्रीफलाची अवहेलना करावी ही ती प्रवृत्ती होय. संहिताकाळानंतर ब्राह्मण ग्रंथांची रचना झाली. त्यांनी यज्ञयागांतील बाह्य कर्मकांडाचे इतके अवडंबर माजविले की, त्यामुळे वेदांतील ऐश्वर्याकांक्षा, विजिगीषा, रसरशीत चैतन्यमय जीवन यांचा लोपच झाला. उपनिषदांनी यज्ञयागावर अत्यंत कठोर टीका केली, यज्ञसंस्थेची हेटाळणी केली ती यासाठीच. अर्थाला सोडून शब्दाचेच महत्त्व मानणे ही कर्मकांडाइतकीच दुसरी अनर्थावह प्रवृत्ती होय. मीमांसकांनी ही अधोगामी प्रवृत्ती अगदी पराकाष्ठेला नेली. पण तेवढ्यावर हे संपले नाही. तर पुढील काळात शब्दनिष्ठेने अखिल भारतीय जीवन व्यापून त्यातील जीवनरस शोषून घेतला. वेदांतील शब्दांना महत्त्व, भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातील शब्दांना महत्त्व, गुरुमुखातील शब्दांना महत्त्व! गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे यांतील शब्दांना महत्त्व म्हणून मग त्यांचा कीस काढून त्यांतील अर्थाला स्वमताकडे खेचून आणण्याची धडपड. अध्यात्म, काव्यशास्त्र, विद्याव्यासंग या सर्व क्षेत्रांत या शब्दनिष्ठेने चैतन्याचा नाश करून हिंदूंच्या बुद्धीला