पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 


गुण जन्मनिष्ठ असले तर :
 जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्यव्यवस्था ही केव्हा हितावह ठरेल ? जर त्या त्या वर्णाचे किंवा जातीचे लोक, नित्यनियमाने, शास्त्रकारांनी त्या वर्णाच्या म्हणून सांगितलेल्या गुणांनी संपन्न असतील तर. ब्राह्मण जातीत जन्मलेला प्रत्येक मनुष्य किंवा त्या जातीचे बहुसंख्य लोक तन, निग्रह, ज्ञान, चारित्र्य या गुणांनी, तसेच क्षत्रिय जातीतील लोक, शौर्य, धैर्य, प्रजापालनदक्षता, इत्यादी गुणांनी; असे सर्व वर्णीय लोक आपापल्या शास्त्रप्रणीत गुणांनी युक्त असतील तरच जन्मनिष्ठ व्यवस्थेला अर्थ आहे. पण असे कधीही घडत नाही. पूर्वी घडलेले नाही व पुढेही घडणार नाही. त्यामुळे ब्राह्मणांची कर्तव्ये अमुक, क्षत्रियांची तमुक, असे नुसते शास्त्र सांगण्याचा काहीही उपयोग नाही. कारण तसे नुसते शास्त्र सांगण्याने गुण निर्माण होत नसतात. ब्राह्मणांच्या अंगी जन्मतः श्रेष्ठ गुण नसतात व नुसत्या उपदेशाने ते निर्माण होत नाहीत हे प्राचीन शास्त्रकारांना चांगले समजलेले होते. प्राचीन काळीसुद्धा, ब्राह्मण शास्त्रविहित यजनयाजन इ. व्यवसायांपेक्षा अन्य निषिद्ध व्यवसाय करीत असत. अशा ब्राह्मणांना श्राद्धाला बोलावू नये असे सांगून, शास्त्रकारांनी त्यांची एक प्रचंड यादी दिली आहे. तीवरून हे स्पष्ट दिसते की, जन्मावर गुणसंपदा त्या काळीही अवलंबून नव्हती. अत्रिस्मृतीत ब्राह्मणांच्या दहा प्रकारांची एक यादी दिली आहे. तीत देवब्राह्मण, मुनिब्राह्मण हे श्रेष्ठ प्रकार सांगून झाल्यावर शूद्रब्राह्मण, निषादब्राह्मण, पशुब्राह्मण, म्लेच्छब्राह्मण, चांडाळब्राह्मण असेही ब्राह्मणांचे प्रकार सांगितले आहेत. आणि या प्रकारचे ब्राह्मण ठोंबे, शंख, गुंड, मवाली, आततायी, आचारहीन, चोर, दरोडेखोर होते असे सांगितले आहे. अपरार्क या शास्त्रकाराने, जन्माने ब्राह्मण असूनही जे ब्राह्मण नव्हेत अशांचे सहा प्रकार सांगितले आहेत. सरकारी नोकरी करणारा, क्रयविक्रय करणारा, अनेकांचे यजमानकृत्य करणारा, सबंध खेड्याची भिक्षुकी करणारा, वेळेवर संध्या न करणारा व खेड्यात किंवा शहरात नोकरी करणारा, हे ते सहा प्रकार होत. अनुशासपर्व (महाभारत) म्हणते की, 'काही ब्राह्मण चोर आहेत, काही डोंबारी, काही नाचे पोरे व काही डँबिस आहेत !'
 पण खेदाची गोष्ट अशी की, अशा ब्राह्मणांचाही मान राखावा, त्यांना पूजेसाठी बोलवावे, त्यांना दान द्यावे असा उपदेश शास्त्रकारांनी केलेला आहे.