पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विघटना
७९
 

असो अविद्वान असो. तो देवच आहे. (मनु ९- ३८४) इतर स्मृती व पुराणे यांत ब्राह्मणांची अशीच अहमहमिकेने प्रशंसा केलेली आढळते. 'जन्मनैव महाभागो ब्राह्मणो नाम जायते नमस्यः सर्व भूतानाम् ॥' अशा तऱ्हेची वचने सर्वत्र सापडतात.
 यातली विस्मयकारक गोष्ट अशी की, ज्या ग्रंथात तप, ज्ञान, चरित्र्य, मनोनिग्रह यांमुळे मनुष्य ब्राह्मण ठरतो, हे गुण नसतील तर तो जन्माने ब्राह्मण असला तरी शूद्र होतो व त्याला शूद्राप्रमाणेच वागवावे, असे निर्धाराने सांगितले आहे. त्याच ग्रंथांतून वरील वचनेही सापडतात. पण वर सांगितलेच आहे की मागल्या बहुतेक सर्व ग्रंथांत नित्य भर पडत गेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्रंथरूप जाऊन त्यांना कोशरूप आले आहे. तेव्हा त्यांत असली ध्रुवभिन्न वचने सापडली तर नवल नाही. जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते की, असली विवेकहीन, निर्बुद्ध, आंधळी भर घालण्यामुळे ग्रंथकाराला काही दृष्टिकोन असतो, त्याला काही व्यक्तिमत्त्व असते, त्याचे काही स्वतंत्र तत्त्वज्ञान असते, हा विचारच भारतातून पुढे पुढे नष्ट झाला. हिंदुसमाजाच्या प्रगतीला हे अपकृत्य अत्यंत घातक झालेले आहे. थोर ग्रंथकारांचे व्यक्तिमत्व ही राष्ट्राची मोठी शक्ती आहे. तीच या भर घालणाऱ्या लोकांनी नष्ट करून टाकली. असो.
 विषमतेचा दुसरा ओघ समतेबरोबरच कसा वाहात होता याची काही कल्पना वरील ब्राह्मणगौरवावरून येईल. ब्राह्मण केवळ जन्माने श्रेष्ठ मानावा हा विचार विषमतेचे विष समाजात निश्चितपणे रुजवितो. ब्राह्मणांची कर्तव्ये सांगताना, या सर्व शास्त्रकारांनी फार उदात्त कल्पना मांडलेल्या आहेत, यात शंका नाही. ब्राह्मणांनी अहोरात्र वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, धर्महीनांकडून दान घेऊ नये, राजापुढेही याचना करू नये, यजन- याजन, अध्ययन-अध्यापन, दान- प्रतिग्रह हीच त्याची कर्तव्ये, या कर्तव्यात थोडे दिवस जरी खंड पडला तरी ब्राह्मण्य लोपेल; अशा तऱ्हेची असंख्य वचने शास्त्रग्रंथांत सापडतात. आणि याप्रमाणे आचरण करणाऱ्या ब्राह्मणास अग्रमान द्यावा, असे सांगितले तर ते आक्षेपार्हही होणार नाही. पण ही लक्षणे ज्यांच्या ठायी दिसत नाहीत त्यांनाही पूज्य मानावे, असे म्हटले की समाजाचा अधःपात अटळ होतो.